शेतकरी तोट्यात अन व्यापारी फायद्यात; हे चित्र लवकरच बदलणार : अशोक डक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 01:50 PM2020-09-07T13:50:59+5:302020-09-07T13:53:16+5:30
मुंबई बाजार समितीचे सभापती डक यांची ग्वाही
परभणी : हमी भाव, वीज समस्या आणि धरणातील पाण्याचा लाभ होत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी कायम अडचणीत असतो. या शेतकऱ्यांना मुंबई बाजार समितीच्या माध्यमातून न्याय देण्याची आपली भूमिका राहील, तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, अशी ग्वाही मुंबई बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अशोक डक यांनी दिली.
सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा मुंबई बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अशोक डक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ, ग्राहक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे, रणजीत गजमल, किशोर लहाने, अप्पासाहेब डक, सुनील डक, अनिकेत डक, राजहंस डक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डक म्हणाले, ‘बाजारपेठेत आवक वाढली की भाव कमी होतात. हंगाम संपल्यावर परत भाव वाढतात, या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांना कमी भावात माल विक्री करावा लागतो. मात्र, शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे जास्त फायद्यात राहतात, हे वास्तव आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई बाजार समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.’