परभणीत दुधाच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:25 AM2018-11-28T00:25:39+5:302018-11-28T00:25:52+5:30
शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दूध उत्पादकांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले जात आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय दूध दरामधील २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, दुधाचे पेमेंट वेळेवर करावे, अनुदान वेळेवर उपलब्ध करुन द्यावे, परभणीतील शासकीय दृध डेअरीची साठवणूक क्षमता वाढवावी, इंधन दरवाढीमुळे वाहतूक कमिशनमध्ये वाढ करुन ते अंतरापर्यंत द्यावे, दूध संस्थेचे थकित कमिशन तात्काळ वाटप करावे इ. मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरी समोरील वसमत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. मुख्य रस्ता अडवून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक तास हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, केशव आरमळ, लक्ष्मण वाकळे, रामप्रसाद गमे, भागवत वाघ, जयराम गिराम, दिनकरराव साबळे, पांडुरंग तायनाक, ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर बोकारे, विठ्ठल शिंदे, दीपक गरुड आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.