अग्रिम पीकविम्यासाठी मानवतच्या शेतकऱ्यांनी केले मुंडन आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:18 PM2023-08-28T17:18:21+5:302023-08-28T17:18:52+5:30
मानवत तालुक्यातील चार ही महसूल मंडळाचा अग्रीम पीकविमा देण्याची मागणी
- सत्यशील धबडगे
मानवत: शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा द्यावा या मागणीसाठी मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर मुंडन आंदोलन करून लक्ष वेधले. पावसा अभावी पिके हातातून गेली असल्याने शेतकऱ्यांना अग्रिम विमा देऊन दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी केली.
मानवत तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिके वाया गेलेली आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाचा २१ दिवसाचा खंड पडूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना अग्रीम देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. सातत्याने मागणी करूनही कंपनी अग्रिम विमा देत नसल्याने शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुंडन करून प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. तहसीलदार पल्लवी टेमकर, तालुका कृषी अधिकारी जी. ए. कोरेवाड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद मदनराव घाडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे, बीआरएसचे बालासाहेब आळणे, बाजार समितीचे संचालक कृष्णा शिंदे, विशाल यादव, अमोल कदम, मनसेचे दत्तराव शिंदे, माकप किसान सभेचे अध्यक्ष लिंबाजी कचरे, माधव नाणेकर, बीआरएस तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, प्रा. प्रकाश भोसले, रामप्रसाद निर्मळ, संतोष जाधव, माणिक सोन्नेकर, उक्कलगाव सरपंच दादा गायकवाड, आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
अग्रिम पीकविमा तत्काळ देण्याच्या मागणीसाठी मानवतच्या शेतकऱ्यांनी केले मुंडन आंदोलन pic.twitter.com/VMgrGZexZj
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 28, 2023
दहा शेतकऱ्यांनी केले मुंडन
मानवत तालुक्यातील केकर जवळा, कोल्हा रामपुरी मानवत या चारही महसूल मंडळाचा अग्रिम पीकविमा देण्याच्या यादीत समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज आक्रमक आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर १० शेतकऱ्यांनी मुंडन करून मागण्यांकडे लक्ष वेधले.