ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे चिखलात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 05:59 PM2022-10-17T17:59:39+5:302022-10-17T17:59:56+5:30
परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.
सेलू (परभणी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत. परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी आज रायपूर येथील शेतकऱ्यांनी चिखलात उभे राहून आज सकाळी आंदोलन केले.
परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. संततधार पाऊस चालू आहे. यामुळे हाताशी आलेले सोयाबीन व कापसाचे पिक मातीत गेले. परंतु, प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही. रायपूर, हातनूर, साळेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामध्ये सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. पाणी साचल्याने उभे सोयाबीन पिक व कापून ठेवलेल्या सोयाबीनचे मातेरे झाले. अजुनही पंचनामे करण्यासाठी अधिकारी गावात पोहोचले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत शेतातील चिखलात उभे राहून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली. आंदोलनात रामेश्वर गाडेकर, गुलाबराव गाडेकर, सचिन गाडेकर, वसंत गाडेकर, वैभव गाडेकर, पांडुरंग सोळंके, अशोक गायकवाड, सुरेश गाडेकर, अमोल गाडेकर, माऊली हिंगे, बालासाहेब हिंगे, संतोष गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, विकास हिंगे, पंकज गाडेकर, राजू गिरी यांचा सहभाग होता.