शेतकऱ्यांनो खात्री करूनच बियाणे घ्या; बोगस बियाणांची विक्री प्रकरणी तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 06:42 PM2023-06-10T18:42:44+5:302023-06-10T18:43:49+5:30
याप्रकरणी उत्तर प्रदेश मधील एक आणि मध्य प्रदेशातील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल
मानवत: कृषी विभागाच्या पथकाने 9 जून एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून कबड्डी वाणाच्या तब्ब्ल 950 बॅग जप्त केल्याची कारवाई केली होती. कापसाच्या बनावट कबड्डी वाणाची साठवणूक विक्री आणि उत्पादन केल्याप्रकरणी चार जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
बनावट कबड्डी वाणाच्या 1 हजार पाकिटांची वाहतूक 9 जून रोजी एका चारचाकी वाहनातून होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. यावरून जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी डी. टी. सामले, जिल्हा कृषी अधिकारी एस. पी. बालसेटवार, मानवत पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण सरकटे, पोउनि अशोक ताठे, पो ह नारायण सोळंके यांच्या पथकाने चारचाकी ( क्रमांक एम पी 09 बी सी 7872 ) वाहनाचा पाठलाग केला. शहरातील पेट्रोल पंपाजवळ चारचाकीला अडविण्यात आले. तपासणी केली असता वाहनात तब्बल 950 बॅग आढळून आल्या. बॅग जप्त करून वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, आज संशयित बनावट बियाणांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी किरण सरकटे यांच्या तक्रारीवरून शिवम बायोक्रॉप साईसचे सरोज तिवारी, अमेठी उत्तर प्रदेश व वाहतूकदार लोमेश भगवान पाटील, तुषार रवींद्र पाटील, मोहित चंद्रकांत इंगळे ( रा मध्यप्रदेश ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील कृषी बियाणे विक्रेते व्यंकटेश चौधरी यांना या बियाणे संदर्भात संशय आल्याने त्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला संपर्क साधून माहिती दिली होती.