शेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:05 PM2018-06-26T18:05:09+5:302018-06-26T18:05:38+5:30

फेरफार करण्यास विलंब करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या महिला तलाठ्याच्या मनमानीला कंटाळुन कोद्री येथील शेतकऱ्याच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतुन घेत तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Farmer's son attempted suicide in Gangakhed tehsil office | शेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Next

गंगाखेड (परभणी ) : फेरफार करण्यास विलंब करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या महिला तलाठ्याच्या मनमानीला कंटाळुन कोद्री येथील शेतकऱ्याच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतुन घेत तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील वडिलोपार्जित शेतजमीनीचा वाद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात चालु होता याप्रकरणी दि. २० जानेवारी २०१८ रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांच्या बाजूने निकाल दिला. अपिलार्थी यांचे अपिल मान्य करीत कायदेशीर वारस घेतलेल्या फेरफार क्रमांक ७७८ बाबत कुठलाही हस्तक्षेप न करता तो कायम करण्याचे व नोंदणीकृत हक्कसोड नोंदविण्यात आलेला फेरफार क्रमांक २५४० हा बेकायदेशीर ठरवून तो फेरफार तसेच अनाधिकाराने विक्री व्यवहारातून झालेला फेरफार क्रमांक २६५९ हा रद्द करण्याचा आदेश निकालात दिला होता. 

गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी

या निकालाची प्रत अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांनी कोद्री सज्जाच्या तलाठी प्रियंका सखाराम उकंडे यांच्याकडे देऊन उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती त्यांच्याकडे वारंवार केली होती. मात्र तलाठी उकंडे यांनी फेरफार रद्द करून दुसरे फेरफार घेण्यास विलंब केल्याचा व या कामासाठी सहा ते सात वेळा परभणी येथे बोलावुन घेत काम करण्यास चालढकल केली. याप्रकरणी अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांचा मुलगा नागनाथ उर्फ लखन लटपटे यांनी सुध्दा तलाठी उकंडे यांच्याकडे काम करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी मला वारंवार फोन करुन तगादा लावुन त्रास का देता मी महिला आहे असे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तलाठ्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागनाथ लटपटे यांनी मंगळवार रोजी तहसिल कार्यालयात अंगावर रॉकेल ओतुन घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी येथे उपस्थित नागरिकांनी पोलीसांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोउपनि रवि मुंडे, सपोउपनि मोईनोद्दीन पठाण, जमादार वसंत निळे, उमाकांत जामकर, शेख जिलानी, सुग्रीव कांदे, सतीश दैठणकर, अव्वल कारकुन दत्तराव बिलापट्टे, तलाठी शिवाजी मुरकुटे आदींनी तहसील कार्यालयात धाव घेऊन नागनाथ यास ताब्यात घेतले. यावेळी चांगलाच गोधळ उडाला होता.

दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश
फेरफार करण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने व तलाठ्याने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने शेतकऱ्याच्या तरुण मुलाने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उपविभागीय अधिकारी गावंडे, तहसीलदार जिवराज डापकर यांच्या समक्ष घडल्याने याप्रकरणी कोद्री सज्जातील फेरफार करण्यास विलंब का झाला याची माहिती घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ अधिकारी, तलाठी यांची चौकशी समिती नेमुन दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे यांनी दिले.

Web Title: Farmer's son attempted suicide in Gangakhed tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.