पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा बँकेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:29+5:302021-09-04T04:22:29+5:30
खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप करताना शेतकरी अनेक महिन्यांपासून वंचित आहेत. बँक ऑफ बडोदा शाखेस १३ गावे दत्तक आहेत. ...
खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप करताना शेतकरी अनेक महिन्यांपासून वंचित आहेत. बँक ऑफ बडोदा शाखेस १३ गावे दत्तक आहेत. मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी बँकेत कागदपत्रे दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंतही बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक कर्जाची रक्कम वर्ग केली नाही. शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरिपाची पेरणी केली. असे असतानासुद्धा केवळ उडवाउडवीची उत्तरे बँक प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. साळेगाव, रायपूरसह इतरही गावातील शेतकऱ्यांनी संतप्त होऊन बँकेत ठिय्या अंदोलन केले. यावेळी जयसिंग शेळके, राजेंद्र गाडेकर, शरद आकात, लक्ष्मण गायके, बाळू आकात, प्रकाश गायके, दिलीप गायके, वैभव गाडेकर, भागवत बालटकर, सचिन गाडेकर, राहुल भिसे, प्रसाद बालासाहेब गायके, सुंदर ढवळे, रमेश गायके, भास्कर गायके, गंगाधर गाडेकर, संजय गायके, कालिदास ढवळे, गणेश आकात, अमोल गाडेकर, दगडोबा भिसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
बुधवारपर्यंत रक्कम वर्ग
बँक प्रशासनाच्या वतीने कर्मचारी उपलब्धता कमी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत असे सांगण्यात येत आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना पैशासाठी खासगी सावकारांना विनवणी करावी लागत आहे. मात्र, बुधवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक कर्जाची रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन बँक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.