शेतकऱ्यांनो सावधान; २२ हजार बियाणांच्या शुद्धता तपासणीत तब्बल ४ हजार २५३ नमुने अपात्र
By मारोती जुंबडे | Published: January 25, 2024 12:29 PM2024-01-25T12:29:23+5:302024-01-25T12:39:47+5:30
मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे.
परभणी : शेतकऱ्यांना पेरणीसाठी शुद्ध व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत वर्षभरात २२ हजार ४२ बियाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २५३ नमुने अपात्र ठरले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू व हरभरा बियाणांचा समावेश आहे.
परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील आठ जिल्ह्यांतून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदींसह २९ पिकांची बियाणे रब्बी व खरीप हंगामापूर्वी तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत या बियाणे नमुन्यांचे शुद्धता व उगवण क्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याचे आर्द्रता, इतर पिकांची भेसळ, कीडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणांची भेसळ तपासण्यात येते. कपाशीच्या बीटी वाणांचेसुद्धा तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली यासह आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेता येते.
परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण केंद्रात २०२२-२३ या वर्षात २२ हजार ४२ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील या केंद्राच्या वतीने २१ हजार ११३ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२५३ बियाणांचे नमुने पेरणीसाठी अपात्र ठरल्याची माहिती परीक्षण प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी यू. जी. शिवणगावकर यांनी दिली.
सर्वाधिक साडेनऊ हजार सोयाबीन बीजाचे परीक्षण
मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचे व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून कार्य केल्या जाते. वर्षभरात २२ हजार ४२ बियाणे नमुने या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आले होते. त्यातील ४२५३ बियाणे हे पेरणीसाठी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे ९४१६ बियाणे तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे मिळाले. त्यातील ८६४६ बियाणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक ३३४० बियाणे हे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घेताना काळजी घ्यावी.
हरभऱ्याचे २७४ नमुने अपात्र
खरीप हंगामानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली जाते. नगदी पीक म्हणून सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे पाहत आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला बाजारपेठेत मागणी ही वाढली आहे. परभणी शहरातील बीज परीक्षण केंद्राकडे ४६५९ हरभऱ्याचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील ४६५९ बियाणांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील २७४ नमुने हे नापास झाले.