ढगाळ वातावरणामुळे शेतकरी अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:56+5:302021-01-08T04:51:56+5:30
मोकाट कुत्र्यांचा गंगाखेडात सुळसुळाट गंगाखेड: गंगाखेड शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. जवळपास २०० पेक्षा अधिक ...
मोकाट कुत्र्यांचा गंगाखेडात सुळसुळाट
गंगाखेड: गंगाखेड शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. जवळपास २०० पेक्षा अधिक कुत्रे शहरातील रस्त्यांवर फिरत आहेत. हे कुत्रे पादचाऱ्यांच्या अंगावर धावूृन जात असल्याने नागरिक कमालीचे वैतागले आहेत. नगरपालिकेच्या संबंधित विभागाने या प्रकरणी कारवाई करुन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामावर परिणाम
गंगाखेड: गंगाखेड नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. येथील मुख्याधिकाऱ्यांचा पदभार अन्य शहरातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. ते नेहमी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने प्रशासकीय कारभार ढेपाळला आहे. नागरिकांना जन्म नोंदणी दाखला, बेबाकी, ना हरकत, रहिवासी, नवीन वीज मीटरसाठी प्रमाणपत्र मिळत नाही.
रस्त्यावरील धुळीने वाहनधारक त्रस्त
सोनपेठ: सोनपेठ शहर व परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ तयार झाली आहे. हवा आल्यानंतर या धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
जिंतूर: शहरातील अण्णा भाऊ साठे मार्ग ते टेलिफोन ऑफिस या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या खड्ड्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे.
निवडणूक विभागाचे काम संथ गतीने
जिंतूर: जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या तसेच निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या या संदर्भातील अधिकृत माहिती तब्बल ३ दिवसानंतर देण्यात आली. निवडणूक विभागाच्या या संथ कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
सौर दिव्यांसाठी नव्या बॅटरीची गरज
देवगावफाटा: विजेच्या बचतीसाठी ग्रामपंचायतींना प्रशासकीय यंत्रणेकडून सौर दिवे देण्यात आले होते; परंतु, बहुतांश सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे हे सौर दिवे सद्यस्थितीत बंद आहेत. या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे.
कृषीपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
देवगावफाटा: तालुक्यात शासनाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले आहेत. विजेसाठी शेतकऱ्यांनी शुल्क भरले असले तरी त्यांना महावितरणने अद्याप जोडणी दिलेली नाही.
लाईनमन नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील अनेक गावांसाठी स्वतंत्र लाईनमन नसल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. काही ठिकाणी खाजगी व्यक्तींना हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय कायम आहे.
शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
जिंतूर: तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीचे कारण पुढे करुन पंचायत समिती व तहसील कार्यालयातील कर्मचारी गायब होत आहेत. त्यामुळे या कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. कामानिमित्त आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक तालुक्यात वाढली
गंगाखेड : तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. पोलीस ठाण्याच्या समोरुनच ही वाहने जात असताना या प्रकरणी शहर ठाण्याचे कर्मचारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.