कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आता मिळणार ‘फॉरेन टूर’
By मारोती जुंबडे | Published: January 23, 2024 02:34 PM2024-01-23T14:34:49+5:302024-01-23T14:35:42+5:30
अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त करून शेतकरी निवड यादी कृषी आयुक्तालयास ५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
परभणी : राज्याबाहेर ‘प्रक्षेत्र भेट’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर आता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित केले आहेत. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील शेतीबाबत विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी कृषी विभागाच्या वतीने राज्यातील १०८ शेतकऱ्यांना आता ‘फॉरेन टूर’ मिळणार आहे. यामध्ये लातूर विभागातील १५ शेतकऱ्यांचा नंबर लागणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हे ध्येय यापुढे न राहता, उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेगवेगळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनेसाठी कृषी विभागाकडून यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान, तेथील शेतकऱ्यांनी त्यांचा केलेला अवलंब, त्याद्वारे त्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. त्या-त्या देशांतील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी आदीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचविण्याकरिता हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त करून शेतकरी निवड यादी कृषी आयुक्तालयास ५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील ५० शेतकऱ्यांना शेती अभ्यासासाठी फॉरेन टूर मिळणार आहे.
या देशांतील होणार शेती अभ्यास
कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिल्ली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या देशात शेती अभ्यासासाठी जायला मिळणार आहे.
हा आहे योजनेचा मुख्य उद्देश
विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनाचे बाजार, व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती, यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योग्य त्या प्रगतशील शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड करून परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृषी विभाग देणार प्रतिशेतकरी एक लाख
शासनाकडून शेती अभ्यास दौऱ्याकरिता शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान म्हणून देणार आहे. हा दौरा शेतकरी अभ्यास दौरा असल्याने प्रवासामधील ज्या ठिकाणांना भेटी द्यावयाच्या आहेत. त्याची पूर्वकल्पना परदेशामध्ये पाळावयाची बंधने, पूर्वतयारी, हवामानानुसार पेहराव, सोबत सामानाची वजन मर्यादा, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याबाबतची मान्यता, चलन उपलब्धता याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दौऱ्याआधी कृषी विभागाकडून दिली जाणार आहे.
कृषी विभागाचे परिपत्रक आले
शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी आयोजित देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याबाबत कृषी विभागाचे परिपत्रक मिळाले आहे. त्यानुसार इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज घेत, शेतकरी निवड यादी आयुक्तालयास ५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावयाची आहे.
-रवी हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.