आईच्या आत्महत्येनंतर वडील मनोरुग्ण झाले; नैराश्यात मुलाने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:44 PM2023-05-26T19:44:12+5:302023-05-26T19:44:39+5:30
आई- वडिलांच्या मृत्यूनंतर आजीने केला सांभाळ; मजुरी करत असलेल्या मुलाने संपवले जीवन
सेलू (जि.परभणी) : काही वर्षांपूर्वी आईने आत्महत्या केली होती. यानंतर वडील मानसिक रुग्ण झाले. आजीने दोन नातवांचा सांभाळ केला पण त्यातील एकाने वाकी येथे नैराश्यातून राहत्या घरी बुधवारी रात्री गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
सेलू तालुक्यातील वाकी येथील कृष्णा नाईकनवरे हे मिल्ट्रीमध्ये नोकरीस होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा वाकी येथे कुटुंबासह राहू लागले. त्यांना चक्रधर आणि चैतन्य अशी दोन मुले. दहा वर्षांपूर्वी पत्नीने स्वतः जाळून घेत जीवन संपविले. त्यानंतर कृष्णा नाईकनवरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यानंतर त्यांच्या सासू चित्राबाई गाढवे यांनी दोन नातवांचा सांभाळ केला. शेत नाही म्हणून ही दोन्ही भावंड सेलू येथे एका खासगी मिलमध्ये मजूर म्हणून काम करत आहेत. त्यातील थोरला चक्रधर हा मिलमध्ये ड्युटीवर गेला होता. धाकटा चैतन्य कृष्णा नाईकनवरे (१९) याने वाकी येथे बुधवारी रात्री जेवण करून घरीच आजीच्या बाजूला असलेल्या घरात झोपण्यासाठी गेला.
आई वारली, वडील मानसिक आजारी, शेती नाही, मजुरी करावी लागते या कारणाने नैराश्यातून पाइपच्या आड्याला चैतन्य याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खबर भगवान नाईकनवरे यांनी सेलू ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलिस हवालदार सदाशिव सूर्यवंशी यांनी पंचनामा करून सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सेलू ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. आजी चित्राबाई गाढवे आणि भाऊ चक्रधर नाईकनवरे यांच्या हंबरड्याने ग्रामस्थांचे डोळे पाणावले.