बापाच्या प्रेम प्रतापाने दोन लेकरं उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:12+5:302021-08-21T04:22:12+5:30
कोरोनाच्या महामारी व धास्तीने सर्व जग चिंतेत असताना पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर परिसरात १८ ते २० जणांची टोळी ...
कोरोनाच्या महामारी व धास्तीने सर्व जग चिंतेत असताना पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर परिसरात १८ ते २० जणांची टोळी ऊस तोडणीसाठी आली होती. एकमेकांच्या विश्वासाने दहा जोडपी व त्यांचे मुलं-बाळं तात्पुरत्या निवाऱ्यात राहत होते. उसाची तोडणी झाल्यानंतर सर्व जण झोपेत असताना यापैकी एकाची १६ वर्ष वयाची मुलगी १८ मार्च रोजी सकाळी गायब झाली. परिसरात तिचा शोध घेतला परंतु, तिचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक गुट्टे व त्यांचे सहकारी पोना किशोर कवठेकर यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. तपास प्रक्रिया सुरू असताना त्यांच्या लक्षात आले की, याच टोळीतील रघुनाथ मारोती धनवे व त्याची पत्नी हे दोघेही त्याच दिवशी पासून गायब आहेत. पोलिसांचा या दोघांवर संशय वळला. टोळीतील इतर मंडळींकडून त्या दोघांचा मोबाईल नंबर घेतला. परंतु, रघुनाथचा फोन लागत नव्हता. मात्र पत्नीचा फोन लागला. पत्नीला विश्वासात घेऊन तिला पूर्णा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक शकुंतला डुकरे यांनी त्या महिलेस विश्वासात घेतले. विचारपूस केल्यानंतर पत्नीने त्या मुलीस तिच्या पतीने लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले असल्याची माहिती पुढे आली. अपहरण झालेली मुलगी कुठे आहे. याचा पत्ता लागला. परंतु, ते दोघे कुठे आहेत याबाबत ठावठिकाणा नव्हता. पत्नीने रघुनाथचा दुसरा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. तो मोबाईल अस्तित्वात असल्याने त्याचे लोकेशन तपासण्यात आले. मोबाईलच्या लोकेशन वरून तो पुणे शहर परिसरात असल्याचे दाखवत होता. तपास आधिकारी पोलीस उपनिरीक्षक माणिक गुट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे गाठले. २२ मार्च रोजी त्या दोघांना पुणे येथे एका भाजी मंडीतून ताब्यात घेतले. दोघांना पूर्णा येथे आणल्यानंतर घटनाक्रम उलगडत होता. तपासात मिळालेल्या माहितीवरून रघुनाथची पत्नी व पीडित मुलगी हिची चांगली मैत्री झाली होती. शेतातील ऊस तोडताना या दोघी मिळून काम करीत होत्या. या दोघीं सोबत रघुनाथही होता. सहवास वाढल्याने एकमेकांचे आकर्षण वाढले. अल्पवयीन व अल्लड वयातील पीडित मुलगी त्याच्याकडे आकर्षित होत होती. अज्ञान आणि शारीरिक आकर्षणाला बळी पडत पीडित मुलगी त्या नराधमाच्या जाळ्यात अडकल्याचे निष्पन्न झाले. पुढे बालकल्याण समिती (चाइल्ड लाइन) समोर पीडित मुलीचा जबाब घेण्यात आला. या जबाबात तिने त्या आरोपीने आपल्यावर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक माहिती सांगितली. या जबाबा नंतर या प्रकरणी गुन्ह्यात वाढ करून आरोपी विरुद्ध २४ मार्च रोजी बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये रघुनाथ व पत्नी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी दिल्याने दोघा आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.