शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:52+5:302021-09-10T04:24:52+5:30
परभणी : शेती पिकांची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी मोबाइल ॲप विकसित केले आहे. मात्र हे ॲप ...
परभणी : शेती पिकांची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी मोबाइल ॲप विकसित केले आहे. मात्र हे ॲप डाऊनलोड करून त्यात नोंदी भरताना शेतकरी मात्र भांबावून गेले आहेत.
टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासनाच्या करारातून हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून मोबाइल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक पेरणीची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंद करावयाची आहे. ही माहिती नोंद केल्यानंतर शासनाला गावनिहाय, तालुकानिहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना मोबाइलच हाताळता येत नाही. काही जणांकडे ॲड्रॉईड मोबािल आहे. त्यामुळे या ॲपने शेतकरी त्रस्त झाले आहेत. नोंदणीलाही प्रतिसाद कमी आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
n ई-पीक पाहणी ॲप डाऊनलाेड करून त्यात माहिती भरावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे. यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळादेखील घेतल्या जात आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांकडे ॲड्रॉईड मोबाइल नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
प्रशिक्षणाचा अभाव
n शासनाने एका चांगल्या उपक्रमातून ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. परंतु, प्रत्यक्षात हे ॲप डाऊनलोड करून त्यात माहिती भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले नाही.
n त्यामुळे ॲप डाऊनलोड कसे करायचे? त्यात पीकनिहाय माहिती कशी भरायची याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याशिवाय ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेच्या समस्याही शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना या ॲपसंदर्भात प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात हे ॲप हाताळण्याचे प्रशिक्षण दिले नाही.
- उत्तम घाडगे, शेतकरी
ई-पीक पाहणी ॲपविषयी शासनाने जनजागृती करावी, शेतकऱ्यांना या ॲपची गावात जाऊन माहिती द्यावी.
- अनंतराव कोरडे, शेतकरी