विद्यार्थ्यांची पावणेसहा कोटींची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:03 AM2018-07-08T01:03:58+5:302018-07-08T01:05:00+5:30
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या खाजगी कृषी महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम पाच वर्षांपासून शासनाकडे थकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र आर्थिक समस्यांना तोंड देत शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या खाजगी कृषी महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम पाच वर्षांपासून शासनाकडे थकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र आर्थिक समस्यांना तोंड देत शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने शासनाच्या वतीने शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांमार्फत अदा केले जाते. एका चांगल्या हेतुने ही योजना राबविली जात आहे; परंतु, त्यासाठी वेळेत निधी दिला जात नाही. मागणी केलेल्या निधीच्या तुलनेत निम्माच निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याची आजपर्यंतची स्थिती आहे. २०११-१२ पासून विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क शासनाकडे थकल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय महाविद्यालय प्रशासनालाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांना शिक्षण संचालक तथा कृषी अधिष्ठाता यांच्या कार्यालयातून दिल्या जाणाºया रक्कमेपैकी सुमारे ४ कोटी ८६ लाख ६४ हजार ३८५ रुपये शासनाकडे थकले आहेत. तर सहयोगी अधिष्ठाता शिक्षण यांच्या कार्यालयातून खाजगी विना अनुदानित कृषीतंत्र विद्यालयांना दिल्या जाणा-या रक्कमेपैकी ८७ लाख ६७ हजार ५७५ रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत. ही रक्कम प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी मिळणे अपेक्षित आहे. मात्र पाच वर्षांपासून रक्कम थकली आहे.
---
१२ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती
खाजगी विना अनुदानित कृषी महाविद्यालयांमध्ये ५ वर्षात १२ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांची शिक्षण प्रतिपूर्तीची ही रक्कम थकली आहे. त्यात विना अनुदानित महाविद्यालयांमधील ९ हजार ५६ आणि कृषी तंत्र विद्यालयांमधील ३ हजार ९२६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
---
वर्षनिहाय प्रलंबित रक्कम
कृषी महाविद्यालये
२०११-१२ : ९८, १४, १००
२०१२-१३ : १, ४७, २५,५६५
२०१३-१४ : ५५, १६,४७३
२०१४-१५ : ००००
२०१५-१६ : १,८६, ०८,२४७
एकूण ४, ८६, ६४,३८३
कृषी तंत्र विद्यालये
२०११-१२ : २२,८२,१३६
२०१२-१३ : ३४,७०,५००
२०१३-१४ : १०, ८३,२१६
२०१४-१५: ००००
२०१५-१६ : १९, ३१,७२३
एकूण ८७, ६७,५७५