परभणीत वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:32 AM2018-03-10T00:32:31+5:302018-03-10T00:32:40+5:30
जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १५७४ ब्रास वाळू चोरी झाल्या प्रकरणी वाळू साठवणूक करणाºया ८ जणांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १५७४ ब्रास वाळू चोरी झाल्या प्रकरणी वाळू साठवणूक करणाºया ८ जणांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
पाथरी तालुक्यात जुलै २०१७ या महिन्यात २२ ठिकाणी अवैध वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त वाळूसाठे संबंधित गावाच्या पोलीस पाटलांच्या ताब्यातही देण्यात आले होते. २२ वाळू साठ्यात जवळपास ४ हजार ५०० ब्रास वाळू साठविण्यात आली होती. मात्र जप्त वाळूसाठ्याला पाय फुटल्याचा प्रकार महसूल विभागाच्या पंचनाम्यात समोर आला होता. जप्तवाळू साठ्यापैकी ९ वाळूसाठ्यातील २ हजार ब्रास वाळू चोरी झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या आदेशानुसार वाळूसाठे ज्या ठिकाणी करण्यात आले आहेत, त्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले होते. मात्र यावर कोणतीच कारवाई होत नव्हती.
४ मार्च रोजी याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाने तातडीने कारवाईसाठी पाऊल उचलली. याबाबत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे यांच्या फिर्यादीवरुन ८ जणांवर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये हादगाव बु., मरडसगाव, वरखेड, मसला खु., लिंबा, डाकू पिंपरी, तारुगव्हाण या गावातील गट नंबरातील १५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी बाबु वामन, पांडुरंग निर्वळ, भास्कर ढगे, ईश्वर ढगे, बापु कुटे, सय्यद एहसान सय्यद पाशा, अरविंद रेड्डी व इतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.