कचऱ्यातून निघणाऱ्या सोन्यावर भरते त्यांचे पोट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:40+5:302021-09-27T04:19:40+5:30
परभणी : सोन्याचे दागिणे बनविणाऱ्या सराफा दुकानांसमोर नाल्यांची सफाई करुन त्या कचऱ्यातून सोने शोधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. ...
परभणी : सोन्याचे दागिणे बनविणाऱ्या सराफा दुकानांसमोर नाल्यांची सफाई करुन त्या कचऱ्यातून सोने शोधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. शहरात असे दोन कुटूंब असून, सराफा बाजारपेठेत नाल्यांची सफाई करताना हे कामगार दिसून येतात.
सराफा बाजारपेठेत सराफा कारागीर सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. हे काम करीत असताना नकळतपणे सोन्याचे कण उडतात आणि हे कण समोरच्या नालीत किंवा रस्त्यावर जाऊन पडतात. आकाराने अतिशय लहान असलेले हे कण दिसून येत नाहीत. अशा वेळी हे कामगार सराफा कारागिरांच्या दुकानासमोरील नाली साफ करणे तसेच रस्ता झाडून तेथील कचरा गोळा करतात. हा कचरा घरी नेऊन तो पाण्यात टाकला जातो आणि काही वेळाने पाण्याच्या बुडाला सोन्याचे बारीक कण दिसून येतात. हे सोने एकत्र करून त्यातून हे कामगार आपल्या कुटुंबीयांची गुजराण करतात. परभणीत केवळ दोन ते तीन कुटूंब असून, या कुटुंबातील आठ ते दहा सदस्य हे काम करतात.
चारशे ते पाचशे रुपयांचे मिळते सोने
शहरातील सराफा बाजारपेठेतील आठ ते दहा दुकानांसमोर कामगार सफाईचे काम करतात. त्यात या कामगारांना दररोज साधारणत: चारशे ते पाचशे रुपयांचे सोने मिळते. हे सोने बाजारपेठेत विकून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
झारेकरी नावाने ओळख
येथील सराफा बाजारपेठेत कचऱ्यातून सोने काढणाऱ्या या कामगारांना झारेकरी या नावाने ओळखले जाते. शहरात या कुटुंबीयांची संख्या अधिक नाही. परंतु, आठ ते दहा जण मात्र हे काम करीत असल्याची माहिती मिळाली.
दागिना किंवा मोठा तुकडा पडला तर करतात मदत
सराफा दुकानांच्या समोरील नालीत एखादा दागिना किंवा सोन्याचा मोठा तुकडा पडल्याचे सराफा व्यापाऱ्यांच्या लक्षात आले तर याच झारेकऱ्यांना बोलावून ठराविक रक्कम दिल्यास ते हे सोने शोधून देतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.