जिल्हा बँकेसाठी १५२१ मतदारांची यादी अंतिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:42+5:302021-01-24T04:08:42+5:30
परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांची अंतिम यादी २० जानेवारी रोजी अंतिम झाली असून, १ हजार ...
परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांची अंतिम यादी २० जानेवारी रोजी अंतिम झाली असून, १ हजार ५२१ मतदार आता या संस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणार आहेत.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने या बँकेची निवडणूक प्रक्रिया घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्याने आहे त्या स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली. जानेवारी महिन्यात पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे बाकी होते. सहकार विभागाने आक्षेप नोंदविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करण्यात आली असून, २० जानेवारी रोजी जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणूक प्रक्रियेची आता प्रतीक्षा लागली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था
ग्रामीण भागातील शेतीशी संबंधित सर्व व्यवहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून होतात. शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य, दुष्काळी अनुदान यासह विमा रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातूनच कामकाज पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा दुवा म्हणून या बँकेची ओळख आहे. त्यामुळे ही बँक ताब्यात घेण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण होते. आता मतदारांची यादी अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
तीन मतदारसंघात मतदारांची विभागणी
या बँकेच्या निवडणुकीसाठी तीन मतदान संघात मतदारांची विभागाणी करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था व धान्य अधिकोष सहकारी संस्थांचा मतदार संघ सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात ९४३ मतदार आहेत. विशेष म्हणजे हे मतदार परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील आहेत. त्याचप्रमाणे कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्थांच्या मतदारसंघात ६४ आणि इतर शेती संस्थांच्या मतदार संघात ५१४ मतदारांचा समावेश आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा, सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था मतदार संघात परभणी आणि हिंगोली तालुक्यात प्रत्येकी ९३, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात ८६, सेनगाव तालुक्यात ८० आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ८३ जिंतूर ५८, सेलू ४९, पाथरी ३७, मानवत ५६, सोनपेठ ३८, गंगाखेड ६७, पालम ६२, औंढा ६३ आणि वसमत तालुक्यात ७८ मतदारांची नोंद घेण्यात आली आहे.