अखेर, परभणी शहरातील 'त्या' अतिक्रमणावर फिरविले बुलडोझर
By राजन मगरुळकर | Published: December 5, 2023 06:19 PM2023-12-05T18:19:54+5:302023-12-05T18:20:38+5:30
परभणी शहरातील वकील भागातील प्रकार
परभणी : शहरातील मध्यवस्तीत रस्त्यावर असलेले बेकायदेशीर अतिक्रमण, बांधकाम मनपाच्या स्वच्छता, प्रभाग समिती आणि शहर अभियंता विभागाच्या पथकाने मंगळवारी बुलडोजर फिरवून पाडले आहे.
शहरातील वकील कॉलनी परिसरात सर्वे नंबर २८९ मध्ये एका फंक्शन हॉलच्या बाजूला उजव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीररित्या अतिक्रमण व बांधकाम केल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या तक्रारीनंतर अनेक वेळेला मनपा प्रशासनाकडून संबंधित अतिक्रमण काढून घ्यावे, अशी नोटीस सुद्धा संबंधित अतिक्रमणधारकाला बजावली होती. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई संबंधितांकडून करण्यात आली नसल्याने अखेर मनपा प्रशासनाने अॅक्शन मोडवर येत हे अतिक्रमण पाडण्यासाठी मंगळवारी मोहीम राबविली.
प्रभाग समिती ब अंतर्गत असलेल्या वकील कॉलनी भागातील अतिक्रमण पाडण्यासाठी पथक सकाळी दाखल झाले. नवा मोंढा पोलिसांच्या बंदोबस्तासह यंत्रणेतील ३० ते ३५ जण या ठिकाणी एकत्र आले. मोजमाप आणि इतर तयारी पूर्ण केल्यानंतर दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने बुलडोजर फिरवून हे अतिक्रमण पाडण्यात आले. मोहिम आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त दशरथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त आवेज हाश्मी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, न्यायरत्न घुगे, अल्तमश खान, पंकज देशमुख, रिजवान पठाण, लोंढे व शहर अभियंता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.