अखेर शिर्शी मार्गाने धावली परभणी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:29+5:302021-02-20T04:48:29+5:30
सोनपेठ तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून सोनपेठवरून जिल्ह्याच्या मुख्यालयी जाण्यासाठी ९० किलोमीटरचा फेरा मारून गंगाखेड किंवा पाथरी मार्गाने ...
सोनपेठ तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून सोनपेठवरून जिल्ह्याच्या मुख्यालयी जाण्यासाठी ९० किलोमीटरचा फेरा मारून गंगाखेड किंवा पाथरी मार्गाने जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. परंतु, १९९९ ला शिर्शी येथे गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र अनेक अडथळ्यांमुळे पुलाचे काम रखडले. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास २० वर्षे लागली. या पुलावरून १८ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच सोनपेठ-परभणी बस सुरू झाली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला असून जवळपास ४५ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. सोनपेठ-परभणी ही बस सोनपेठ, शेळगाव, शिर्शी, भारसवाडा, ब्रह्मपुरी, पोखर्णी मार्गे परभणीला जाणार आहे. ही बस परभणी येथून सकाळी ८, १० व सायंकाळी ६ वाजता सुटणार असून सोनपेठ येथून सकाळी ६, १० व सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
परभणी-पुणे व परभणी-औरंगाबाद बस सुरू करा
सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील गोदावरी नदीवरील पुलावरून वाहतूक चालू झाली आहे. त्यामुळे परभणी- शिर्शी- सोनपेठ- सिरसाळा- तेलगाव बीड मार्गे पुणे व परभणी- शिर्शी- सोनपेठ- सिरसाळा तेलगाव- माजलगाव - गेवराई मार्गे औरंगाबाद बस चालू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.