...अखेर महिला वाहकांसाठी विश्रांतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:13 AM2017-08-01T00:13:37+5:302017-08-01T00:13:37+5:30
कामावरून परत आल्यावर महिला वाहकांना थोडा विसावा मिळावा यासाठी हिंगोली आगार परिसतरातील महिला विश्रांतीगृहाचे बांधकाम अखेर दीड वर्षानंतर पूर्ण झाले. मागील पंधरा दिवसांपूर्वी विश्रांतीगृह महिला वाहकांसाठी खुले करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कामावरून परत आल्यावर महिला वाहकांना थोडा विसावा मिळावा यासाठी हिंगोली आगार परिसतरातील महिला विश्रांतीगृहाचे बांधकाम अखेर दीड वर्षानंतर पूर्ण झाले. मागील पंधरा दिवसांपूर्वी विश्रांतीगृह महिला वाहकांसाठी खुले करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाकडून महिला वाहकांसाठी बसस्थानक परिसरात विश्रांतीगृहाची सुविधा करून दिली जात आहे. कर्तव्यावरून आल्यानंतर महिला वाहकांना या ठिकाणी थोडा आराम मिळावा यासाठी विश्रांतीगृह उभारून दिले जात आहेत. हिंगोली आगार परिसरात मागील दोन वर्षांपासून विश्रांतीगृहाचे बांधकाम संथपणे सुरू होते. सदर बांधकाम लवकर पूर्ण व्हावे याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. उशिराने का होईना; अखेर विश्रांतीगृह वाहकांच्या ताब्यात देण्यात आले. विश्रांतीगृहाच्या इमारतीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छतागृह, लाईटची सुविधा यासह विविध कामे करण्यात आली आहेत. विश्रांतीगृह नसल्याने महिलावाहकांना बसमध्ये विसावा घ्यावा लागत असे. शिवाय स्वतंत्र स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे कुचंबना होत असे. परंतु इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने महिला वाहकांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होणार आहे. परंतु सदर इमारत ही आगार परिसराच्या एका कोपºयात उभारण्यात आली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री तळीरामांकडून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय इमारतीच्या जागेवरून मतभेद होते. परंतु त्यानंतर जागा निश्चितीचा निर्णय झाल्याने इमारतीचे बांधकाम केले. येथील विश्रांतीगृहाच्या बांधकामाकडे विभागीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारतीचे बांधकाम मध्येच बंद पडले होते.