...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:50 PM2018-12-06T18:50:41+5:302018-12-06T18:52:51+5:30
रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली.
परभणी : पेडगाव ग्रामस्थांनी केंद्रीय पथकाचा ताफा अडवून दौरा रद्द का केला, असा जाब विचारल्यानंतर पथकातील अधिकारी नियोजित पेडगाव दौरा करण्यास राजी झाले आणि दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाचा ताफा पेडगाव शिवारातील ओसाड रान आणि दीड दीड फुटाच्या खड्ड्यातून हेलकावे घेत एका शेतात धडकले. अधिकाऱ्यांचा ताफा दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना गराडा घातला. रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली.
परभणी तालुक्यातील हसनापूर- तुळजापूर रस्त्यावरील गणेशराव हरकळ यांच्या शेताची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतात असलेल्या ७०फूट खोल विहिरीत फुटभरही पाणी नसल्याचे हरकळ यांनी सांगितले. पाणी नसल्याने शेती ओस पडली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमीची कामे नसल्याने शेतकरी कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी रोहयोची कामे तातडीने सुरू करा, १०० शेततळे घेण्याचा प्रोग्राम तयार करा अश्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संतोष देशमुख, नागेश चांदणे, श्रीकांत गरड, शरद नंद, अशोक हरकळ, पुरुषोत्तम देशमुख, प्रसाद देशमुख आदींची उपस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पाहणीनंतर पथक मानवत तालुक्यातील रुढीकडे रवाना झाले.