अखेर दीड वर्षानंतर मानवत रोडवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:52 PM2019-11-25T12:52:51+5:302019-11-25T12:54:22+5:30
उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यात असणारे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने सुरु होते.
मानवत : राष्ट्रीय महामार्गावरील मानवत रोड येथील बायपास उड्डाणपुलाचे रखडलेले काम २४ नोव्हेंबर रोजी सुरु झाले असून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या माजलगाव उपविभागांतर्गत मानवत रोडपर्यंतच्या मार्गाचा समावेश होतो. एका बहुराष्ट्रीय कंपनीने दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम केले आहे. या महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान मानवत रोड येथे अंतर कमी करण्यासाठी बायपास मार्ग तयार केला जात आहे. या बायपासमुळे परभणीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मानवत रोडवरुन प्रवास करण्याची आवश्यक राहणार नाही. परभणीचे अंतर दोन ते अडीच किमीने कमी होणार आहे. शिवाय जुन्या मार्गावरील नांदेड -मनमाड या लोहमार्गावर उड्डाणपुल नसल्याने दिवसभरात ३५ ते ४० वेळा रेल्वे वाहतूकीसाठी फाटक बंद केले जाते. त्यावेळी रस्ताच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनांचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेषत: पाथरी व मानवत येथे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ अवस्थेत रुग्णास परभणीला घेऊन जात असताना अडकून पडावे लागते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन बायपासवर उड्डाणपुल तयार केला आहे; परंतु, या उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यात असणारे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने सुरु होते. हा मार्ग हैदराबाद नांदेड, परभणी, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांना असल्याने या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मानवतरोड येथील बायपासचे काम रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नांदेड-मनमाड या लोहमार्गाच्या दुहेरीकरण कामास मंजुरी मिळाल्याने उड्डाणपुलाच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाल्याने आतापर्यंत या पुलाचे काम रेंगाळले होते. या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत होती. शेवटी २४ नोव्हेंबर रोजी या कामाला सुरुवात झाल्याने हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
चाचणी घेऊनच : कामाला केला प्रारंभ
राष्ट्रीय महामार्ग ६१ वर रुढीपाटीपासून एक कि.मी. अंतरावरून परभणीकडे नवीन वळण रस्ता तयार झाला आहे. मात्र या रस्त्यावर उडाणपुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. दीड वर्षानंतर २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पुलाखालून तीन रेल्वे गेल्यानंतर चाचणी घेऊन या पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे काम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री दाखल झाली असून चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिली.