परभणीत निधी वर्ग करण्यास जिल्हा बँकेच्या टाळाटाळीने आर्थिक अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:34 PM2017-12-12T18:34:09+5:302017-12-12T18:35:29+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्याने जि.प.च्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेऊन त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.
परभणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्याने जि.प.च्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेऊन त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.
येथील जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितीचे खाते यापूर्वी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होते. मात्र जिल्हा बँकेत नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी हे खाते इंडिया बँकेत वर्ग केले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींचा जिल्हा बँकेकडे असलेला संपूर्ण निधी इंडिया बँकेत वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र अजूनही ४२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी बँकेने वर्ग केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षातील हा निधी असून, तो मार्च २०१८ अखेर खर्च करावा लागणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जि.प.तील राकाँचे गट नेते अजय चौधरी, शिक्षण सभापती भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास जोगदंड, समाज कल्याण सभापती उर्मिलाताई ब नसोडे, महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी आदींनी जिल्हाधिकारी पी. शिवश्ंकर यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला.जिल्हा बँकेतील हा निधी तत्काळ इंडिया बँकेकडे वर्ग करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.