परभणीत टँकर चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:38 PM2019-07-09T23:38:42+5:302019-07-09T23:39:06+5:30
टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने लावलेल्या टँकर्सपैकी एका टँकर चालकाने परस्पर पाण्याची विक्री केल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने लावलेल्या टँकर्सपैकी एका टँकर चालकाने परस्पर पाण्याची विक्री केल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शाकेर मुसा पटेल यांच्या एजन्सीचे ४४ वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. या वाहनांवर जीपीएस यंत्रणाही आहे. टँकरचालकांना पाणी वाटप करण्यासाठी पॉर्इंट निश्चित करुन दिले आहेत. त्या पॉर्इंटवरच टँकरने पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र सोमवारी यापैकी एका टँकरचालकाने परस्पर खाजगी ठिकाणी टँकरने नेऊन पाण्याची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनपाचे शहर अभियंता वसीम खान वाजीद खान पठाण यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास टँकर क्र.एम.एच.२२/एन २०५८ या टँकरमध्ये एमआयडीसी येथील जलकुंभावरुन पाणी भरण्यात आले. टँकर चालक कैलास रंगनाथ धायतिडक (रा.आंबेटाकळी) यास दत्तधाम परिसरात पाणी वाटप करण्यास सांगितले होते. मात्र टँकर चालक कैलास धायतिडक याने हे टँकर रात्री ८ वाजेपर्यंत जागीच थांबवून ठेवले.
रात्री ८ वाजेनंतर दत्तधामजवळील जीवन संस्कार वसतिगृहात हे पाणी विक्री केले. या संदर्भातील माहिती अक्षय देशमुख यांनी फोनवरुन दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता टँकर चालक कैलास धायतिडक याने सार्वजनिक ठिकाणी पाणी वाटप न करता स्वत:च्या फायद्यासाठी जीवन संस्कार वसतिगृहाला पाण्याची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. वसीम पठाण यांच्या या तक्रारीवरुन कैलास धायतिडक याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.