येलदरी येथे वन विभागाच्या रोपवाटिकेला आग; हजारो रोपटे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:44 PM2018-11-10T18:44:29+5:302018-11-10T18:46:32+5:30
येलदरी येथील वन विभागाच्या नर्सरीला आज दुपारी अचानक आग लागली.
परभणी : येलदरी येथील वन विभागाच्या नर्सरीला आज दुपारी १२.३० च्या दरम्यान अचानक आग लागली. यात रोपवाटिकेतील सर्वच झाडे जळून खाक झाली.
येलदरी येथे 2016-2017 च्या वनविभागाच्या पर्यटन मोहिमेअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी. सिह यांच्या मार्गदर्शनाखाली येलदरी धरणाच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या अतिरिक्त जागेवर वनविभागाने रोपवाटिका उभारली. साडेतीन एकर जागेवर असलेल्या या रोपवाटिकेत तीन हजारहून अधिक विविध प्रकारची झाडे आहेत. आज सकाळी अचानक येथे आग लागल्याने ही सर्व झाडी जळाली. याची माहिती मिळताच सावंगी म्हाळसाचे सरपंच प्रमोद चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर जिंतूरच्या तहसीलदारांनी अग्निशमन दलाची गाडी रोपवाटिकेकडे पाठवली. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत रोपवाटिका जळून खाक झाली होती.