आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम; दोन गावांत आंदोलकांनी भारत संकल्प यात्रा थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 05:43 PM2023-11-25T17:43:23+5:302023-11-25T17:43:48+5:30
शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दररोज दोन गावात कार्यक्रम घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
पाथरी : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे, 24 डिसेंबर पर्यन्त ठीक ठिकाणी लाक्षणिक उपोषण केले जात आहेत. त्यात तालुक्यात आजपासून गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ शासकीय माहिती देण्यासाठी दाखल होत आहे. मात्र, आज तालुक्यातील हदगाव बु आणि खेरडा येथे दाखल झालेल रथ आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी विरोध केल्याने प्रशासनाला परत आणावे लागले. विशेष म्हणजे, खेरडा गावात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी कार्यक्रम बंद कारण्यास प्रशासनाला भाग पाडले.
केंद्र शासनाच्या वतीने गावा गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरवला जात आहे. शनिवारी पाथरी तालुक्यात या रथाची सुरुवात सकाळी 9 वाजता खेरडा येथून झाली. सकाळी रथ गावात येताच गावकऱ्यांनी स्वागत केले. रथामधून माहिती देण्यास सुरुवात ही झाली. त्याचवेळी गावातील मराठा आंदोलक आणि गावकरी जमा होऊन अधिकाऱ्यांना निवेदन देत आम्हाला शासकीय योजना माहिती आहे त्यांचा लाभ ही होतो मात्र आता आरक्षण मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कार्यक्रम नको, अशी भूमिका घेतल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर हाच रथ दुपारी 2 वाजता हदगाव बु येथे पोहचला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. मात्र, येथेही आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे येथील कार्यक्रमही रद्द करावा लागला आहे.
आंदोलकांच्या निवेदानानंतर रद्द
दोन्ही गावात आंदोलक यांनी निवेदन देऊन कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.
- ईश्वर पवार, गटविकास अधिकारी, पाथरी
रोज दोन ठिकाणी कार्यक्रम
शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दररोज दोन गावात कार्यक्रम घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी ड्रोन कॅमेराद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या दिवशीच असा अनुभव आल्याने पुढील काळात या रथाबाबत काय घडामोडी घडतात याकडे पाहणे गरजेचे आहे.