रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभरा पेरा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 05:13 PM2017-12-12T17:13:58+5:302017-12-12T17:17:42+5:30
यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा झाला आहे.
परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा वाढल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी या पावासाचा फटका बसला असला तरी शेतकºयांकडे असलेल्या विहीर, नदी, नाले, बोअर यांना सध्या मूबलक पाणीसाठा आहे. या उपलब्ध पाण्याचा विचार करुन येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी ९ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. तसेच गव्हासाठी ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २१ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. करडईसाठी २५ हजार २०९ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी केवळ २ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी मागील पाच वर्षाचा अनुभव पाहून कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने हरभरा पिकासाठी ५३ हजार ६४ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु, यावर्षी शेतक-यांनी कृषी विभागाचा अंदाज फोल ठरवला आहे. कारण जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी काढणीच्या वेळी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतक-यांनी ज्वारी पिकाच्या पे-याकडे दुर्लक्ष करीत पाच वर्षात सर्वाधिक ७९ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर हरभ-याचा पेरा केला आहे.
ज्वारीची पेरणी केवळ ५७ टक्क्यांवर
ज्वारी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्याकडे पाहिले जाते. त्यानुसार येथील कृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते. मात्र रब्बी हंगाम अर्धा संपत आला तरीही केवळ ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करा
यावर्षी रब्बी हंगामात हरभ-याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे अळीच्या बंदोबस्तासाठी सर्तक राहून शेतक-यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. हरभरा पिकात १० ते १५ लाकडी पक्षी थांबे उभारावेत, जेणेकरुन हे पक्षी अळ्या वेचून खातील व नैसर्गिक पद्धतीने अळ्यांचा बंदोबस्त होईल. तसेच एकरी दोन ते तीन कामगंध सापळे उभारावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. सुखदेव, तंत्र अधिकारी डी.व्ही.नागुरे, क्रॉप सॅपचे कीड नियंत्रक आर.के. सय्यद यांनी केले आहे.