परभणी जिल्ह्यात पाच दिवसांत झाला ६८ दलघमीचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 08:34 PM2018-08-24T20:34:47+5:302018-08-24T20:35:47+5:30
मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला
परभणी: मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला असून जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल ६८.६७४ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच्या पाणीसाठ्यामध्ये १४.६९ टक्क्यांनी वाढ झाल्याने हा पाऊस प्रकल्पांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.
जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधनासह मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. २३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. प्रकल्पही कोरडे होते; परंतु, पिकांसाठीच पाणी नाही तर प्रकल्पांची चिंता दूरची असल्याने शेतकरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करीत होते. स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिके तगली. त्याच जोडीला प्रकल्पांचा पाणीसाठाही वाढला आहे.
१८ आॅगस्ट रोजी येलदरी प्रकल्पामध्ये १६.६५२ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पात ५२.२१४ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याची टक्केवारी ६.४५ एवढी आहे. निम्न दुधना प्रकल्पात १८ आॅगस्ट रोजी ५१.९८० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. आता हा जलसाठा ६५.९८० दलघमीवर गेला आहे. मासोळी प्रकल्प १८ आॅगस्ट रोजी कोरडाठाक होता. या प्रकल्पात सध्या १.१२० दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डिग्रस बंधाऱ्यात ३९.७९० दलघमी पाणी १८ आॅगस्ट रोजी उपलब्ध होते. सध्या या बंधाऱ्यात ४१.६६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुद्गल आणि ढालेगावचे बंधारे तर या काळात ओव्हरफ्लो झाले. १८ आॅगस्टनंतर जिल्ह्यात सलग दोन दिवस सरासरी ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या पावसाळ्यामुळे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मुद्गल बंधाऱ्याला सर्वाधिक लाभ
१८ आॅगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाऱ्यामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २.५८० दलघमी पाणीसाठा या प्रकल्पामध्ये पावसापूर्वी होता. २३ आॅगस्ट रोजी प्रकल्पाच्या घेतलेल्या नोंदीनुसार सध्या या प्रकल्पात ११.३६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला आहे. पाच दिवसांच्या या काळात प्रकल्पामध्ये ८.८ दलघमीची वाढ झाली असून ७७ टक्के पाणीसाठा या काळात उपलब्ध झाला आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये हा पाऊस समाधानकारक ठरला. या प्रकल्पामध्ये ८.२७९ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या प्रकल्पात १४.२६० दलघमी (५७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
मुळीची मात्र उलटी गंगा
जिल्ह्यातील इतर प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असताना गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यात मात्र पाऊस झाल्यानंतरच्या काळात बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. १८ आॅगस्ट रोजी मुळी येथील बंधाऱ्यात १.२१७ दलघमी (१२.१० टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या बंधाऱ्यात ०.९४६ दलघमी (९.४१ टक्के)पाणीसाठा शिल्लक आहे. ५ दिवसांमध्ये जमा झालेले ०.२७१ दलघमी पाणी वाहून गेले आहे. या बंधाऱ्याच्या गेटचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.
५ दिवसांत जमा झालेले पाणी
प्रकल्प दलघमी टक्केवारी
येलदरी ३५.५६२ ४.४
दुधना १३.९१ ४.५
करपरा ५.९९ २४
मासोळी १.१२ ४
डिग्रस १.८७ २.९७
मुद्गल ८.८ ७७.४३
ढालेगाव १.४९ २०
पिंपळदरी ०.०१ ०.२३
एकूण ६८.६७ १४.६९