दोन वाहनांसह पाचशे पोती गहू पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:39+5:302021-07-12T04:12:39+5:30
शहरातील नवा मोंढा परिसरातील श्रेया ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर दोन ट्रक उभे होते. या ट्रकमधील धान्य रेशनचे ...
शहरातील नवा मोंढा परिसरातील श्रेया ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर दोन ट्रक उभे होते. या ट्रकमधील धान्य रेशनचे असावे, असा संशय पोलिसांना आला. १० जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला. तेव्हा दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी २५० पोते असा एकूण ५०० पोते गहू असल्याचे स्पष्ट झाले. हा गहू कुठून आला, याविषयी विचारणा केली; परंतु संबंधित व्यक्तीला माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही ट्रक आणि त्यातील गहू जप्त केला असून, कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक उभे केले आहेत. एकूण ११ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, हा गहू रेशनचा आहे का, याविषयीची खात्री पोलिसांकडून केली जात आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तूपसुंदर, दिलावर खान, किशोर चव्हाण, हरिश्चंद्र खुपसे, शेख अझहर, सय्यद मोबीन, पिराजी निळे, संतोष सानप आदींनी केली.