निकृष्ट खत विक्रीप्रकरणी पाच जणाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:42 PM2019-09-14T18:42:19+5:302019-09-14T18:47:35+5:30
कंपनीने आठ दिवसांपूर्वी केलेल्या खुलासा समाधानकारक नसल्याने कृषी विभागाकडून गुन्हा दाखल
मानवत : निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणा विरोधात कृषी विभागाने १३ सप्टेंबर गुन्हा नोंदविला आहे. विशेष बाब म्हणजे आठ दिवसापूर्वीच याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात कृषी विभागाने गुन्हा नोंद केला आहे.
मानवत कृषी विभागाच्या पथकाने ५ मे २०१९ रोजी शहरातील गणेश अग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी केली होती. या दुकानात गोवा राज्यातील झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे सिंगल सुपर फास्फेट (दाणेदार) खत विक्री करण्यासाठी ठेवण्यात आला होता.यावेळी खताचे पथकाने नमुने घेऊन सदर नमुने औरंगाबाद येथे खत चाचणी प्रयोगशाळेत पाठविले होते.प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हे नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्याने कृषी विभागाने उत्पादक कंपनीला निकृष्ट दर्जाचे खत उत्पादन ,वितरण व विक्री केल्याप्रकरणी कारणे द्या नोटीस बजावुन खुलासा मागवला होता.
या प्रकरणी कंपनीने आठ दिवसांपूर्वी केलेल्या खुलासा समाधानकारक नसल्या कारणाने येथील तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक पी.एच.कच्छवे यांनी १३ सप्टेंबर रोजी झुआरी कंपनीचे व्यवस्थापक गजानन जयराम कवट यांच्यासह कंपनीचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ व व्यवस्थापकाविरोधात विरोधात महाराष्ट्र अत्यावश्यक वस्तू अधिनियमनुसार शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.विशेष बाब म्हणजे ४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष तमशेटे यांनी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात निकृष्ट खत विक्रीप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.