परभणीत शाळेची भिंत कोसळून पाच विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:11 PM2018-07-04T12:11:53+5:302018-07-04T12:12:03+5:30
शहरातील पाथरीरोडवरील एका शाळेची भिंत व टीन पत्र्याचे शेड कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली.
परभणी : शहरातील पाथरीरोडवरील एका शाळेची भिंत व टीन पत्र्याचे शेड कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली.
परभणी शहरातील पाथरी रोडवर नोमानिया कॅम्पस् परिसरातील नोमानिया प्राथमिक उर्दू शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर टीन पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी शाळेच्या खालील बाजूस असलेल्या गार्डनमध्ये विद्यार्थी खेळत असताना अचानक जोराची हवा आल्याने दुसऱ्या मजल्यावर कच्च्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या टीन शेडची भिंत कोसळली. यामध्ये शेडवरील पत्रे आणि भिंतीच्या विटा खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्या.
यामध्ये रईस खान, बुशरा बेगम, तमन्ना अब्दुल वाहेद, सानिया बेगम, रेशमा सय्यद हे पाच विद्यार्थी जखमी झाले. भिंत कोसळल्याचा आवाज आल्यानंतर काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर पळून गेले तर शाळेबाहेरील पालकांनी कोसळलेल्या भिंतीकडे धाव घेतली व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथोमोचार करुन त्यांना नंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलिसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.