परभणी जिल्ह्यातील पाचही साखर कारखाने सुरू; ९ लाख मेट्रीक टन उसाचे झाले गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 07:10 PM2018-01-15T19:10:34+5:302018-01-15T19:12:01+5:30
जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.
- मारोती जुंबडे
परभणी : जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.
पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना, पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी शुगर, गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर, पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथील बळीराजा साखर कारखाना आणि परभणी तालुक्यातील अमडापूर येथील मोहटादेवी- नृसिंह साखर कारखाना कार्यरत आहे. यावर्षी प्रथमच पाचही साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून, ऊस गाळपाला प्रारंभ झाला आहे. या पाच साखर कारखान्यांपैकी अमडापूर येथील मोहटादेवी-नृसिंह साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला दोन दिवसांपूर्वीच प्रारंभ झाला आहे. मात्र उर्वरित चार साखर कारखान्यांचे बॉयलर पेटून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे ऊस गाळपाच्या कामाने वेग घेतला आहे.
गंगाखेड येथील गंगाखेड शुगर कारखान्याने यावर्षी पूर्णक्षमतेने गाळप करण्याची तयारी केली आहे. या कारखाना कार्यक्षेत्रात अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असून, चालू हंगामात ८ लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दररोज ७ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करीत ७२ दिवसांत कारखान्याने जिल्ह्यातील सर्वाधिक ४ लाख ८१ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. विशेष म्हणजे, या गाळपातून ४ लाख ३ हजार ६०० पोते साखर उत्पादन केले आहे. सरासरीच्या तुलनेत ११.२७ च्या उतार्याने गाळप सुरू आहे. सरासरी उतारा ९.७० एवढा आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ६० ते ६५ टक्के गाळप झाल्याची माहिती कारखान्याचे मुख्याधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी दिली.
पूर्णा येथील बळीराजा साखर कारखान्यानेही ऊस गाळपाला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून, कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी येत आहे. आतापर्यंत २ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. तसेच पाथरी येथील रेणुका शुगर कारखान्याने ६२ दिवसांपासून गाळप सुरू केले असून, आतापर्यंत ९१ हजार मे. टन गाळप केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी कारखान्याचे ५६ दिवसांपासून गाळप सुरू आहे. या कारखान्याने १ लाख ५० हजार मे. टन गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून, आतापर्यंत ९१ हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
परभणी तालुक्यातील अमडापूर येथील मोहटादेवी- नृसिंह या साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला आहे. या कारखान्याने कार्यक्षेत्रातील २ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चित केले आहे.जिल्ह्यातील या पाचही साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप केल्याने ऊस उत्पादकांत आशेचा किरण निर्माण झाला आहे.
ऊस उत्पादकांना मिळाला दिलासा
जिल्ह्यातील पाचही साखर कारखाने खाजगी तत्त्वावरील आहेत. दोन वर्षांपूर्वी साखर कारखाने सुरू नसल्याने शेतकर्यांना उभा ऊस जाळून टाकावा लागला होता. त्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत सापडले होते. यावर्षी मात्र सर्वच्या सर्व साखर कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप सुरू केल्याने जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच कारखान्यांनी उसाचा भाव वेगवेगळा दिला असला तरी ऊस शिल्लक राहणार नसल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
ऊसाचे क्षेत्र तिप्पटीने वाढले
यावर्षी जिल्ह्यातील पाचही साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. जायकवाडी प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पाण्याने भरला आहे. त्यामुळे हे पाणी परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठा बर्यापैकी उपलब्ध आहे. परिणामी शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात केवळ ९ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यावर्षी मात्र सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी उसाची लागवड झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
कारखान्यांसमोर रांगा
जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सर्वच कारखान्यांसमोर ऊस घेऊन येणार्या वाहनांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे. आपला ऊस वेळेत जावा, यासाठी उत्पादकांनी उसाची तोड करुन वाहनांसमोर रांगा लावल्या आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता सर्व उसाचे गाळप होईल, अशी शक्यता आहे.