पाथरी तालुक्यातील पाच हजार शिधापत्रिका आधारविना; पुरवठा विभागाच्या वतीने शोध मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:12 PM2018-01-17T15:12:33+5:302018-01-17T15:14:39+5:30
२६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : तालुक्यातील २६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़
केंद्र व राज्य शासनाच्या अन्नधान्याच्या विविध योजनांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्तधान्य दुकानदारामार्फंत अन्नधान्याचे वितरण करण्यात येते़ सार्वजनिक वितरण प्रणालीतील त्रुटी व दोषामुळे अन्नधान्य वाटपाचा बराच सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे़ बोगस लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलून काळाबाजारातही जात आहे़ हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे़ राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वच योजनांमधील शिधापत्रिका लाभार्थ्याच्या आधारकार्डला जोडण्याचा निर्णय घेतला़ मात्र दोन वर्षांपासून आधार जोडणीचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही़ २६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी २० हजार ९०५ शिधापत्रिकाधारकांनी आधारची जोडणी केली आहे़ तर अजूनही ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारला जोडणे बाकी आहे.
आता शिधापत्रिका आधार जोडणी मोहीम हाती घेतली आहे़ १२ ते १५ जानेवारी २०१८ या कालावधीत ग्रामीण भागातील शिधापत्रिका आधार जोडणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली़ यावेळी शिधापत्रिका धारकांचे नाव, गाव, स्थलांतरित, मयत, लग्न झालेल्या महिलांची नोंद घेण्यात आली आहे़ यासोबतच लाभार्थ्यांकडे गॅस सिलिंडर आहे की नाही याचीही माहिती घेतली जात आहे़
१२ हजार ९०८ कार्डांचीच ई-पॉस मशीनला जोडणी
ई-पॉस मशीनच्या साह्याने धान्य वितरण करण्याची सक्ती दुकानदारांना करण्यात आली़ पाथरी तालुक्यात ७८ स्वस्तधान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन वाटप करण्यात आल्या आहेत़ कधी कनेक्टीव्हीटी तर कधी मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने सुरुवातीला बराच गोंधळ पाहावयास मिळाला़ तालुक्यात सध्या ७८ ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप केले जाते़ परंतु, ई-पॉस मशीनला केवळ १२ हजार ९०८ कार्डांचीच जोडणी करण्यात आली आहे़ गत महिन्यापासून पुरवठा विभागाने धान्याचा माल द्वारपोहच करण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे दुकानाचे जीपीएस लोकेशन पुरवठा विभागाकडून घेतले जात आहे़ गोदामातून निघालेला माल त्या गावातील दुकानदारापर्यंत जातो की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा अधिक सुकर झाली आहे़
१ लाख लाभार्थी
स्वस्तधान्य योजनेसाठी प्राधान्य लाभार्थी योजनेत ७६ हजार १३७ लाभार्थी आहेत़ तर शेतकरी धान्य योजनेत २६ हजार ७२० लाभार्थी असून, अंत्योदय योजनेत ३ हजार ६१४ लाभार्थी आहेत़ असे १ लाख २ हजार ८५७ लाभार्थ्यांची संख्या तालुक्यामध्ये आहे़
गावा-गावांत अनेक कुटुंंबे वर्षानुवर्षे स्थलांतरित झाले आहेत़ या कुटुंबांच्या नावे स्वस्तधान्य दुकानाला माल मिळतो़ आता या सर्वेक्षणातून स्थलांतरित कुटुंबे वगळली जाणार आहेत़ त्याचबरोबर मयत लाभार्थीही वगळले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
सर्वेक्षण करण्यात येत आहे
तलाठ्यामार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेऊन शिधापत्रिकांना आधार जोडणी केली जाणार आहे. या अहवालानंतरच गॅस धारक आणि आधार जोडणीची स्पष्टता समारे येणार आहे़
- निलेश पळसकर, नायब तहसीलदार, पुरवठा