गळाटी व लेंडी नदीला पूर; १३ गावांचा संपर्क पालमशी तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 01:14 PM2021-09-06T13:14:32+5:302021-09-06T13:15:53+5:30
rain in parabhani : गळाटी व लेंडी नदीचे पात्र उथळ असून दोन्ही नदीवर अरुंद आणि जुने पूल आहेत.
पालम( परभणी ) : पोळ्याच्या पूर्वसंध्येला बालाघाट डोंगर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पालम तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रामुख्याने गळाटी व लेंडी नदीच्या पाण्यामुळे जवळपास १३ गावांचा संपर्क पालमशी तुटला असून सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी ओसरले नव्हते.
गळाटी व लेंडी नदीचे पात्र उथळ असून दोन्ही नदीवर अरुंद आणि जुने पूल आहेत. शिवाय त्यांचे पाणलोट क्षेत्र बालाघाट डोंगर परिसर आहे. म्हणून डोंगर क्षेत्रात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी असल्याने थोड्याशा पावसानंतरही या दोन्ही नद्यांना पाणी येते. त्यात 5 सप्टेंबर 2021 रोजी जोरदार पाऊस झाल्याने या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे पहाटेपासूनच या नदीपलीकडील १३ गावांचा संपर्क पालमशी झालेला नाही. गळाटी नदीपलीकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी तर लेंडी नदीपलीकडील फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी आणि गणेशवाडीचा संपर्क होऊ शकत नाही. अगदी पहाटेपासूनच पूर आल्याने शहरातून पोळा सणासाठी शहरवासीयांना गावाकडे जाता आलेले नाही. दुग्ध व्यावसायिकांचीही मोठी अडचण झाली.