परभणी जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर; २४ तासात ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:30 PM2018-08-22T20:30:15+5:302018-08-22T20:31:02+5:30
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला तर काही भागात नुकसानही झाले आहे.
परभणी: जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला तर काही भागात नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस प्रकल्पातील पाणीसाठ्याच्या वाढीसाठी पोषक ठरला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत परभणी तालुक्यामध्ये ५५.५०, पालम तालुक्यात ५५.६७, पूर्णा ६२.८०, गंगाखेड ५६.५०, सोनपेठ ५९, सेलू ४५.८०, पाथरी ६१, जिंतूर ३५ आणि मानवत तालुक्यात ४६ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ५७ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. पूर्णा, दुधना, गोदावरी, थुना या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. पालम, पूर्णा आणि जिंतूर तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क काही तासांसाठी तुटला होता. दरम्यान, पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.
ढालेगाव, मुद्गल, डिग्रस या बंधाऱ्यांबरोबर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातही पाणीसाठा वाढला आहे. संततधार पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला असला तरी नदीकाठच्या गावांमधील पिकांची नासाडी झाली आहे. शेत जमीन खरडल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
पावसाचा जोर : सात मंडळांमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यात मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम होता. संपूर्ण जिल्हाभरात सरासरी ५२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आठ मंडळांमध्ये जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील पिंगळी मंडळात ६५ मि.मी., पालम तालुक्यातील पालम मंडळात ६९ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ७१, ताडकळस ८४, सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ८०, पाथरी तालुक्यात पाथरी मंडळात ७४ आणि हादगाव मंडळात ७७ मि.मी. पाऊस झाला. परभणी तालुक्यातील परभणी शहर मंडळात ५८, ग्रामीण मंडळात ५४, सिंगणापूर ६२, दैठणा ५५, झरी ५४, पेडगाव ४४ आणि जांब मंडळात ५२ मि.मी. पाऊस झाला.
राहटी बंधारा फुल्ल
परभणी तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून पूर्णा नदीवर उभारलेला बंधारा तुडूंब भरला आहे. विशेष म्हणजे, बंधाऱ्याचे गेट पाण्याखाली गेले असून पुलापासून साधारणत: १० फुटावरुन पाणी वाहत आहे. ३ दलघमी पाणीसाठवण क्षमता असलेला बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने परभणी शहरवासियांचा पाणीप्रश्न मिटला आहे
२७ मंडळे १०० टक्के
जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २७ मंडळांमध्ये आॅगस्ट महिन्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. १० मंडळांमध्ये ७५ ते १०० टक्के आणि दोन मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला.
ढालेगाव बंधारा १०० टक्के भरला
२० आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने २१ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता तालुक्यातील ढालेगाव येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता बंधाऱ्याचे एक गेट उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची क्षमता १४.८७ दलघमी आहे. मागच्या आठवड्यात १७ आॅगस्ट रोजी पडलेल्या पावसाने बंधारा ७५ टक्के भरला. २० आॅगस्ट रोजी या भागात बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने २१ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता बंधारा पूर्णपणे भरला. पाण्याची आवक वाढत असल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता बंधाऱ्याचे एक गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
मुद्गल बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडला
सोनपेठ तालुक्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधारा ९० टक्के भरला आहे. २१ आॅगस्ट रोजी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोनपेठ शहरासह परिसरात १६ आॅगस्टपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुद्गल बंधारा २१ टक्के भरला होता. तर खडका बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साचले होते. दोन दिवसाच्या खंडानंतर २० आॅगस्टपासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने मुद्गल बंधारा ९० टक्के भरला. त्यामुळे सोनपेठ शहराचा पाणीप्रश्न मिटला. तसेच तालुक्यातील शेतकरीही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने समाधानी आहेत.