नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्यांचे आंदोलन मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 06:52 PM2017-12-19T18:52:08+5:302017-12-19T18:53:24+5:30
एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.
परभणी : एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.
एलबीटी थकबाकीच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून व्यापार्यांवर कारवाई सुरु केली होती. या अंतर्गत ७ दुकानांना सील ठोकण्यात आले होते. त्यापैकी तीन दुकानदारांनी थकबाकीची काही रक्कम भरल्याने हे सील काढण्यात आले. तर चार दुकान मालकांनी थकबाकीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने मनपाने या दुकानांचे सील काढले नव्हते. या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने ८ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या अंतर्गत १५ डिसेंबर रोजी व्यापार्यांनी मनपावर मोर्चा काढला होता. याच दिवशी नागपुरात आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानमंडळासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.डॉ.पाटील यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नगरविकास विभागाने एलबीटी थकबाकी वसुलीस स्थगिती देण्यास आली. परंतु, ज्या चार दुकानांना सील ठोकण्यात आले होते. त्यांचे सील काढण्याबाबतचा निर्णय झाला नसल्याने व्यापार्यांनी आंदोलन चालूच ठेवले होते.
या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांना सदरील दुकानांचे सील काढण्याचे सोमवारी आदेश दिले. त्यानुसार मनपाच्या कर्मचार्यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या दुकानांचे सील काढले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. तशी माहिती, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. दरम्यान, दुकानांचे सील काढल्यानंतर व्यापार्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
व्यापार्यांच्या लढ्याला यश
एलबीटी थकबाकीच्या वसुलीला स्थगिती आणल्यानंतर व्यापार्यांच्या ज्या चार दुकानांना वसुलीसाठी सील ठोकण्यात आले होते, ते सील काढण्याची मागणी नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्याकडे केली. त्यानंतर जाधव यांनी ही मागणी मान्य करुन याबाबत आयुक्त राहुल रेखावार यांना सील काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपाने सोमवारी सायंकाळी दुकानाचे सील काढले. त्यामुळे व्यापार्यांच्या लढ्याला यश आले आहे. यापुढेही व्यापार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे.
- आ.डॉ.राहुल पाटील