ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:35 PM2024-07-24T15:35:25+5:302024-07-24T15:36:34+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तरुणांचा सहभाग

For Maratha reservation from OBC, youth protest in Yeldari Reservoir! | ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

- प्रशांत मुळी
येलदरी (जि. परभणी) :
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तातडीने लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजातील तरुणांनी पूर्णा प्रकल्पाच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयात बुधवारी जलसमाधी आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

राज्य शासन मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी सांगितले. जलसमाधी आंदोलनात जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील तरुण, महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने येलदरी जलाशयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, एनडीआरएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

शासनाने मराठा समाजाला नुसते आश्वासने न देता आधी आरक्षण द्यावे, नंतरच निवडणूक घ्यावी अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशाराही यावेळी देत प्रशासनाला निवेदन सादर केले. साधारणपणे हे आंदोलन दीड ते दोन तास करण्यात आले.

Web Title: For Maratha reservation from OBC, youth protest in Yeldari Reservoir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.