निवडणुकीमध्ये कामाची सक्ती आता भत्ता देण्यासाठी मात्र हात आखडता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:43 IST2025-03-07T19:43:06+5:302025-03-07T19:43:44+5:30
कर्मचाऱ्यांचे निवडणुकीतील मानधन आणि भत्ता निवडणूक आयोगाकडून अद्याप देण्यात आला नाही.

निवडणुकीमध्ये कामाची सक्ती आता भत्ता देण्यासाठी मात्र हात आखडता
- विठ्ठल भिसे
पाथरी : विधानसभा निवडणुकीचे सोपस्कार पूर्ण झाले. सरकार सत्तेत आले. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या कर्मचाऱ्यांचे निवडणुकीतील मानधन आणि भत्ता निवडणूक आयोगाकडून अद्याप देण्यात आला नाही. याबाबतची ओरड आता या कर्मचाऱ्याकडून होत असून हा भत्ता केव्हा मिळणार, अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. निवडणूक काळात अधिकाऱ्यांवर सक्ती होती. मात्र, आता मानधन देण्यास हात का आखडता घेतला जात आहे, याचे कोडे या अधिकाऱ्यांना पडले आहे.
पाथरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. विधानसभा मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी तालुक्यातील काही गावे असा भाग येतो. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक बुथवर विविध कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त केले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी या मतदारसंघांमध्ये तब्बल ५३ क्षेत्रिय अधिकारी नेमले होते. निवडणूक काळामध्ये या अधिकाऱ्यांकडे पाच ते सहा बूथ निगराणीसाठी देण्यात आले होते. एका क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे सहा ते सात मतदान केंद्रांचे नियोजन होते. मतपेट्या घेतल्या का ? त्या सुरक्षित पोहोचल्या का? मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे का ? मतदान सुरळीत आहे का ? प्रत्येक दोन घंट्यानंतर मतदानाची टक्केवारी घेणे आणि वरिष्ठांना पाठवणे. मतदान पेट्या व्यवस्थित पोहोचवणे ही कामे प्रामुख्याने क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे होती. त्याचबरोबर मतदान मोजणीसाठी प्रक्रियेच्या ठिकाणी थांबणे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी चोख पार ही पाडली. मात्र, निवडणूक होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी हे अधिकारी मानधनापासून क्षेत्रीय वंचित अद्याप वंचित आहेत.
७ हजार ५०० रुपये भत्ता
विधानसभा निवडणुकीमध्ये क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना सात हजार ५०० रुपये भत्ता देणे अपेक्षित होते. निवडणुकीदरम्यान या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना एक हजार पाचशे रुपये कॅश स्वरूपात भत्ता वाटप करण्यात आला. मात्र, भत्त्याची उर्वरित रक्कम या अधिकाऱ्यांना अद्यापपावेतो मिळाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार इतर मतदारसंघांमध्ये क्षेत्रिय अधिकारी यांना सात हजार पाचशे रुपये भत्ता निवडणूक दरम्यान वाटप करण्यात आल्याने पाथरी मतदारसंघातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला
निवडणूक काळामध्ये काम करणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना पंधराशे रुपये भत्ता वाटप केला. आणखीन त्यांना उर्वरित सात हजार पाचशे रुपये भत्ता दिला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. शासनाकडूनच रक्कम उपलब्ध झाली नसल्याने ती उपलब्ध होताच अधिकाऱ्यांना भत्ता वाटप केला जाणार आहे.
- शैलेश लाहोटी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाथरी