२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी
By मारोती जुंबडे | Published: May 25, 2024 04:57 PM2024-05-25T16:57:57+5:302024-05-25T16:59:09+5:30
परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे.
परभणी: येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशूगणनेत २३ पानवठ्यावरून ५४२ वन्यप्राणी टिपल्याची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आहे. या अहवालात सर्वाधिक हरीण आढळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशु गणना होते. या गणनेत पशुंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजनांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे दरवर्षी वन विभागाकडून पशु गणना केली जाते. यंदा २२ ते २४ मे दरम्यान बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणस्थळावरील वन्यप्राणी प्रगणना करून वन विभागाला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिंतूर व परभणी तालुक्यातील २३ पानवठ्यावर ५४२ वन्यप्राणी पशु गणनेत टिपल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मोर, ससा, हरिण, नीलगाय, रानडुक्कर आदींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
इटोली, जिंतूर बिटात सर्वाधिक पशू
वन विभागाने केलेल्या गणनेमध्ये जिंतूर आणि ईटोली या बीटामध्ये पशूंची संख्या अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये जिंतूर येथील बिटात कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, मोर असे एकूण १३६ वन्यप्राणी आढळले. तर केहाळ येथील एका पाणवठ्यावर मोर, ससा असे एकूण १२ प्राणी आढळले. त्याचबरोबर भोगाव येथे मोर, वानर, ससा, रानडुक्कर असे एकूण ४४ प्राणी दिसून आले. त्याचबरोबर ईटोली येथील पाच कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, मोर असे एकूण ८६ पशु वनविभागाच्या गणनेत दिसून आले. त्याचबरोबर दाभा येथील दोन कृत्रिम पाणवठ्यावर एकूण ३३ वानर, नीलगाय, डुक्कर, कोल्हा, हरिण पशुपक्षी आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.
आठ तालुक्यात वन्यप्राणी नाहीत का?
परभणी येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत जिंतूर तालुक्यातील केहाळ, जिंतूर, भोगाव, इटोली, दाभा, गारखेडा, सावरगाव, चौधरणी, वडाळी, आडगाव, मोहखेड येथील पाणवाठ्यावरच पशूंची गणना करण्यात आली. यामध्ये ४९७ पशुपक्षी आढळून आले. त्यामुळे वनविभागाने केवळ एकाच तालुक्यात पशूंची गणना केली आहे का? नसेल तर परभणीसह इतर आठ तालुक्यांमध्ये एकही कोल्हा, काळवीट, ससा, मोर, वानर वास्तव्यास नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.