स्वच्छतेच्या मागणीसाठी माजी खासदार बसले मनपाच्या पायऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:02 PM2019-11-18T18:02:51+5:302019-11-18T18:04:17+5:30
महापालिकेतील अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. केवळ कागदोपत्री कामे करुन बिले उचलली जात असल्याचा आरोप
परभणी- शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेची कामे होत नसून महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही लक्ष दिले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. सुरेश जाधव यांनी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील पायºयांवर बसून अनोखे आंदोलन करीत मनपाच्या विरोधातील संताप व्यक्त केला.
शहरात स्वच्छता आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच मथुरानगर, कृषी सारथीनगर या भागात रस्त्यावर गुडघ्या इतके खड्डे पडले आहेत. महापालिकेचे आयुक्त, नगरसचिव, नगरसेवक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मथुरानगर, कृषीसारथी नगर भागातील रस्त्यांच्या समस्यकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच भागात माझे निवासस्थान आहे आणि त्याच ठिकाणी अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणच्या अवस्थेबद्दल बोलयायलाच नको. महापालिकेतील अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. केवळ कागदोपत्री कामे करुन बिले उचलली जात असल्याचा आरोप सुरेश जाधव यांनी यावेळी केला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील पाय-यांवर अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत त्यांनी मुलभूत प्रश्नांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.