सेलुमध्ये एकाच रात्री चार घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 06:05 PM2017-10-15T18:05:18+5:302017-10-15T18:08:52+5:30
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे १४ आॅक्टोबर रोजी चोरट्यांनी चार घरे फोडून मोबाईल, मोटारसायकल, सोन्याच्या दागिन्यांसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला़ या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
परभणी, दि. १५ : सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे १४ आॅक्टोबर रोजी चोरट्यांनी चार घरे फोडून मोबाईल, मोटारसायकल, सोन्याच्या दागिन्यांसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला़ या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़.
देवगावफाटा येथे आसाराम मोरे यांच्या कुलूप बंद असलेल्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला़ कपाटातील तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने , तसेच एमएच २३ ए़जी़ ७८७२ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली़. याच बरोबर मदन बहिरट यांच्या घरातील रोख १५ हजार रुपये, मधुकर मोरे यांच्या घरातील मोबाईल, सुखदेव मोरे यांच्या घरातील १० हजार रुपये चोरट्यांनी पळविले़ शनिवारी (दि. १४) मध्यरात्री या चारही घरांत चोरीच्या घटना घडल्या़.
चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली़ चोरून नेलेल्या दोन लोखंडी पेट्या बाजुच्या शेतात टाकून त्यातील किंमती वस्तु घेवून चोरटे पसार झाले़. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला़ ज्ञानेश्वर मोरे यांनी या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, बीट जमादार गुलाब भिसे, गणेश चेके यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़ पोलीस उपनिरीक्षक घोळवे तपास करीत आहेत़
श्वानाने काढला माग
या घटनेनंतर परभणी येथून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते़. यानंतर श्वानाने गावापासून मुख्य मार्गावरील पुलापर्यंत या चोरट्यांचा माग काढला़