प्रयागराज येथे बोट उलटून परभणीच्या चार भाविकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:42 PM2018-12-11T12:42:39+5:302018-12-11T12:44:33+5:30
परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी, नांदेड जिल्ह्यातील कोळंबी आदी ठिकाणचे १४ भाविक ४ डिसेंबर रोजी काशी येथे गेले होते.
परभणी : प्रयागराज काशी येथे अस्थीविसर्जन करुन परत येत असताना यमुना नदीच्या पात्रात नाव बुडल्याने परभणी तालुक्यातील दैठणा येथील ३ आणि माखणी येथील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील कोळंबी येथील दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी, नांदेड जिल्ह्यातील कोळंबी आदी ठिकाणचे १४ भाविक ४ डिसेंबर रोजी काशी येथे गेले होते. सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास काशी येथील प्रयागराज मनकाश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस अस्थी विसर्जित करुन नाव परत येत असताना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही नाव यमुना नदीच्या पात्रात उलटली.
घटनेनंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत परभणी तालुक्यातील दैठणा येथील राधाबाई केशवराव कच्छवे, भागाबाई बळीराम कच्छवे, लक्ष्मीबाई केशवराव कच्छवे तसेच माखणी येथील बाबुराव रामचंद्र सिसोदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील कोळंबी येथील बालाजी डिगंबर बैस, डिगांबर रामराव बैस या दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, कोळंबी येथील रमेश डिगंबर बैस हे अद्याप बेपत्ता आहेत.
हे भाविक सुखरुप
काशी येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या भाविकांपैकी केशव ज्ञानोबा कच्छवे (दैठणा), मनोहर बैस, भारती बैस (कोळंबी), अंगद नारायणराव कच्छवे (कोकणगाव), मीनाक्षी आणि सुनिता देवीदास बैस (कोळंबी) हे भाविक सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.