पोलिस वसाहतीत जुगार खेळणारी चार पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:32 PM2019-10-01T19:32:55+5:302019-10-01T19:34:07+5:30
येलदरी रस्त्यावरील पोलिस वसाहत येथील घटना
जिंतूर : शहरातील येलदरी रस्त्यावरील पोलिस वसाहतीमधील एका घरांमध्ये जुगार खेळणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. या चारही पोलिसांवर मंगळवारी (दि.1 ) जिल्हा पोलीस प्रमुखांनी निलंबनाची कार्यवाही केली.
याबाबत अधिक वृत्त असे की, येथील उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊन त्या जागी आयपीएस श्रवण दत्त हे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काही पोलिस कर्मचारी पोलिस वसाहतीमधीलच एका घरात पत्ते खेळत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी सहकार्यांसमवेत त्या ठिकाणी धाड टाकली असता पोलीस कर्मचारी पांडुरंग तुपसुंदर, किशोर भूमकर, त्र्यंबक बडे, अशोक हिंगे हे त्यांना त्या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 1500 रु रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. यावरून दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली. या घटनेमुळे मात्र जिंतूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.