रस्त्यात अडवून व्यापाऱ्याकडील सोने लुटणारे चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 08:11 PM2019-03-30T20:11:53+5:302019-03-30T20:13:58+5:30

पाथरी येथील घटना: स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी

Four robbers arrested in pathari in gold looted case | रस्त्यात अडवून व्यापाऱ्याकडील सोने लुटणारे चौघे गजाआड

रस्त्यात अडवून व्यापाऱ्याकडील सोने लुटणारे चौघे गजाआड

Next

परभणी : सोन्या-चांदीचे दागिणे घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिण्यांची लुट करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

१३ फेब्रुवारी रोजी पाथरी येथील व्यापारी शेख सौरभ अली शेख अमजद अली हे त्यांचे दुकान बंद करुन मोटारसायकलवरुन घरी जात असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करीत दागिण्यांची बॅग हिसकावून नेली होती. सुमारे १२ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे कारने पळून गेले होते. या घटनेनंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

परभणी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन सापळा रचला. परभणी शहरात मोटारसायकलवरुन जाणाऱ्या कृपानसिंग हत्यारसिंग टाक (२३, रा.कळमनुरी ह.मु.अहमदपूर) आणि रुपसिंग चतुरसिंग टाक (२३, रा.सोलापूर सरगमनगर) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा करताना गौतम भगवानदास आदमाने (२५, रा.सारोळा) आणि प्रताप मधुकर मस्के (३२, रा.आर्वी ता. परभणी) हे दोघेही सोबत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा करण्यासाठी एक कार आणि एक दुचाकी वापरल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस पथकाने उर्वरित दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले आहे. सोने लुटीच्या प्रकरणात अटक झालेल्या चारही आरोपींकडून २० तोळे सोने, २ किलो चांदी, एक इंडिका कार, एक मोटारसायकल तीन मोबाईल, एक खंजर असा १२ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ४५दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे ,सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, जमिरोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, गौस पठाण, दिलावर पठाण, शंकर गायकवाड, विशाल वाघमारे यांनी केली. 

Web Title: Four robbers arrested in pathari in gold looted case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.