४ वर्षीय बालकाचे अपहरण; पालमहून हैदराबादला गेले, परताना पोलिसांच्या सापळ्यात अडकले

By राजन मगरुळकर | Published: March 2, 2023 06:42 PM2023-03-02T18:42:17+5:302023-03-02T18:45:35+5:30

२४ तासात शोधले चार वर्षीय अपहृत बालकाला, दोन आरोपी ताब्यात 

Four-year-old abducted child found in 24 hours, two accused in custody | ४ वर्षीय बालकाचे अपहरण; पालमहून हैदराबादला गेले, परताना पोलिसांच्या सापळ्यात अडकले

४ वर्षीय बालकाचे अपहरण; पालमहून हैदराबादला गेले, परताना पोलिसांच्या सापळ्यात अडकले

googlenewsNext

परभणी : पालम तालुक्यातील फळा गावातील चार वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा बुधवारी पालम ठाण्यात नोंद झाला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना परभणी, पालम पोलिसांनी अवघ्या २४ तासात सापळा रचून हैदराबाद मार्गावर देगलूरजवळ तेलंगणा सीमेवर सापळा रचून कारसह ताब्यात घेतले. अपहृत चार वर्षाच्या बालकास गुरुवारी पोलीस अधीक्षक रागसुधा.आर यांनी आई-वडिलांकडे सुपूर्द केले.

पालम तालुक्यातील फळा गावातील चार वर्षीय मुलाचे अपहरण २८ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाले होते. याबाबत मुलाच्या आई-वडिलांनी पालम ठाण्याला माहिती दिल्याने गुन्हा नोंद झाला. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे, पालमचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांना पथक नेमण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अपहरणकर्त्यांनी मुलाला हैदराबादकडे नेल्याचे समजले. त्यानुसार हैदराबाद पोलिसांशी संपर्क केला. अपरणकर्त्याने हैदराबादहून परत महाराष्ट्राकडे मुलाला घेऊन निघाल्याची माहिती समजल्याने पोलिसांनी देगलूर ठाण्याच्या हद्दीत तेलंगणा सीमेवर सापळा रचून दोन आरोपीस मुलासह ताब्यात घेतले. याप्रकरणी अपहरणकर्ते गोविंद रानडे व सविता पौळ यांना कारसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, संजय करनूर, गुलाब बाचेवाड, मारुती कारवार, दिनेश सूर्यवंशी, शंकर कोलमवाड, किशोर बनाटे, शीला कोरडे, व्यंकट येवते, बाबू सिंगनवाड, सुग्रीव केंद्रे, माणिक डुकरे, अर्जून बळवंते, रामचंद्र पोले, संदीप भोसले, बालाजी रेड्डी यांनी केली.

पोलीस अधीक्षकांनी दाखविला ममत्व भाव
अपहरणकर्त्या मुलाला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर त्याचे आई-वडीलही समवेत होते. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर. यांनी बालकाशी व त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधून आस्थेने चौकशी केली. बालकासाठी चॉकलेट्स देत आई-वडिलांना बालकाने जेवण केले का, तो बरा आहे का, काही अडचण असल्यास सांगा, असे बोलून ममत्व भाव दाखविला. अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका पोलिसांनी केल्याने व पोलीस अधीक्षकांनी दाखविलेल्या आस्थेने पालकही गहिवरून गेले होते.

Web Title: Four-year-old abducted child found in 24 hours, two accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.