चार वर्षांपासूनच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:10 PM2019-11-05T19:10:10+5:302019-11-05T19:13:29+5:30

डोळ्यात पाणी आणणाऱ्या भावना शेतकरी व्यक्त करीत असताना पंचनाम्यासाठी आलेले अधिकारीही स्तब्ध झाले

Four years of drought-free dream is spoiled | चार वर्षांपासूनच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नांची राखरांगोळी

चार वर्षांपासूनच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नांची राखरांगोळी

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीन व कापसाच्या बोंडाला फुटले अंकुरशेतकऱ्यांच्या शब्दांनी पथकही झाले स्तब्धशेतकऱ्यांनी मांडल्या नुकसानीच्या व्यथा

- विठ्ठल भिसे 

पाथरी : उशिरा का होईना; आगमन झालेल्या पावसामुळे हिरवागार शेतशिवार पाहून चार वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडल्याने यावर्षी तरी दुष्काळमुक्ती होईल. डोक्यावरच कर्ज फिटेल आणि घरातही थोडीफार संपन्नता येईल, अशी स्वप्नं उराशी बाळगून पोटच्या पोराप्रमाणे शेतातील सोयाबीनच्या पिकाला जपलं. सोयाबीनची कापणी करुन गंजी शेतात लावली; परंतु, अतिवृष्टीने कहर झाला आणि जमा करुन ठेवलेलं सोयाबीन काळवंडलं. शिवाय काही ठिकाणी शेंगांना अंकुरही फुटले. त्यामुळे यंदा दुष्काळमुक्त होण्याच्या पाहिलेल्या स्वप्नांची राख रांगोळी झाली, अशा डोळ्यात पाणी आणणाऱ्या भावना शेतकरी व्यक्त करीत असताना पंचनाम्यासाठी आलेले अधिकारीही स्तब्ध झाल्याचे चित्र सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतशिवारात पहावयास मिळाले.

जिल्ह्यात १ आॅक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास सव्वा तीन लाखा हेक्टर जमिनीवरील सोयाबीन व कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकासोबत सदरील प्रतिनिधीने पाहणी केली. त्याअंतर्गतचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ नुकसानीची भयावह स्थिती मांडणारा ठरला. पाथरीचे तहसीलदार यु.एन.कागणे, मंडळ अधिकारी जे.डी.बिडवे, कृषी सहाय्यक जी.एम.ढगे, तलाठी सुग्रीव प्रधान, ग्रामसेवक यु.डी.पाते यांच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता बोरगव्हाण येथील शेतशिवारातील पिकांचा पंचनामा सुरु केला.

पथक उत्तम बाबाराव उगले यांच्या शेतात दाखल झाले. उगले यांच्याकडे चार हेक्टर शेती असून दोन हेक्टरवर कापूस तर १ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला आहे. त्यांच्याकडे पाथरी येथील स्टेट बँकेचे ४ लाख रुपयांचे कर्ज असून त्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. उगले यांनी शेतात सोयाबीनचे पीक चांगले आल्याने त्याची काढणी करुन गंजी लावून ठेवली होती; परंतु, रास करण्यापूर्वीच अतिवृष्टीची झड सुरु झाली आणि गंजी करुन ठेवलेले सोयाबीन काळवंडले. शिवाय या सोयाबीनच्या शेंगाला अंकुर फुटल्याचे दिसून आले. यावेळी हताश होऊन बोलताना  उत्तम उगले म्हणाले की, पोटच्या पोराप्रमाणे या पिकाला वाढवलं. शेतात आलं की हिरवंगार शिवार पाहून यावर्षी चांगलं उत्पन्न मिळलं अस वाटलं. सोयाबीन व कापूस काढून विक्री केल्यानंतर आलेल्या पैशातून डोक्यावरचं कर्ज फिटल आणि घर संसारात चार पैसे लावता येतील, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल. चार वर्षे दुष्काळाने पाठ सोडली नाही. त्यामुळे यावर्षी तरी दुष्काळमुक्ती होऊन थोडीफार संपन्नता येईल, असं वाटलं;परंतु, हा अति पाऊस आला आणि काढून ठेवलेल्या पिकासोबत आमंची स्वप्नंही काळवंडली. काय करावं समजत नाही? आता सरकारकडूनच मदतीची अपेक्षा आहे. देवदूत बनून तुम्हीच न्याय द्या, असे उगले म्हणाले. त्यावर पथकातील अधिकाऱ्यांनी सदरील शेतकऱ्याला दिलासा देत शासन तुमच्या पाठिशी आहे, संकटातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासा दिला.

त्यानंतर पंचनाम्याची औपचारिकता पूर्ण करुन हे पथक बाजुचे शेतकरी सुरेश इंगळे यांच्या शेतात दाखल झाले. या शेतात १५ एकरवर सोयाबीनचा तर ७ एकरवर कापसाचा पेरा करण्यात आला होता. त्यांच्यावर बँकेचे ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज असून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या शेतातील ७ एकरवरील उभ्या कापसाच्या बोंडांला अंकुर फुटल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी कापसाला कीड लागल्याचे दिसून आले. यावेळी येथील शेतकरी सुरेश इंगळे यांनीही पथकासमोर आल्या व्यथा मांडल्या. पांढऱ्या सोन्याने आयुष्याला झळाळी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, निसर्गाच्याच कदाचित मनात नसेल, त्यामुळेच गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं झालं.  १५ एकरवरील सोयाबीन वाया गेलं. यावर्षी शेतातील पिकांच्या जोरावर दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्याचं स्वप्नं होतं; परंतु, या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. सरकारनं कितीही मदत दिली तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही. कष्टाच्या घामाचं चीज होऊन हक्काचा पैैसा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, ती फोल ठरली, असेही या शेतकऱ्याने सांगितले. या शेतकऱ्यालाही पथकातील अधिकाऱ्यांनी दिलासा देत पंचनामा पूर्ण केला आणि जवळेचे शेतकरी वैजनाथ इंगळे यांचे शेतशिवार गाठले.

इंगळे यांना १ हेक्टर जमीन असून त्यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे पीक पाण्यात बुडल्याचे दिसून आले. त्यांच्यावर ७० हजार रुपयांचे पीक कर्ज होते. त्यापैकी ५३ हजार रुपये कर्जमाफीत माफ झाले. आता उर्वरित कर्ज कसे फेडायचे आणि मुलांचे शिक्षण, घर संसार कसा चालवायचा असा सवाल त्यांनी पथकासमोर त्यांनी उपस्थित केला. पंचनाम्याच्या वेळी त्यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबराईने पथकही हतबल झाल्याचे पहावयास मिळाले. येथेही पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा देत पंचनाम्यासाठी पुढचे शेतशिवार गाठले.

शासनाकडून किती आणि कधी नुकसान  भरपाई मिळेल ?
यावेळी पथकातील अधिकाऱ्यांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडून आम्हाला किती आणि कधी? नुकसान भरपाई मिळेल, असा प्रश्न केला. त्यावर अधिकारी निश्चितपणे काहीही सांगू शकले नाहीत. शासन निर्णयानुसार योग्य ती मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेल, असे या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर शेतकऱ्यांनी शासनाने या संकटाकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पहावे. शब्दांचा खेळ न करता शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी, विनंतीही यावेळी पथकातील अधिकाऱ्यांकडे केली. 

बोरगव्हाण या गावची भौगोलिक माहिती
गावातील भौगोलिक क्षेत्र  ५९१.७२ हेक्टर
लागवड लायक क्षेत्र ५७३.३२ हेक्टर
कापूस     २५४ हेक्टर
सोयाबीन     १८२ हेक्टर
तूर     ६५ हेक्टर

सरसकट पंचनामे संयुक्त पथकामार्फत 
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पाथरी तालुक्यातील ५६ गावांत सरसकट पंचनामे संयुक्त पथकामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी याकामी सहकार्य करावे. या आठवड्यात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मंडळनिहाय आम्ही स्वत: बांधावर जात आहोत.
- यु.एन.कागणे, तहसीलदार, पाथरी.

Web Title: Four years of drought-free dream is spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.