पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा

By राजन मगरुळकर | Published: May 19, 2023 01:40 PM2023-05-19T13:40:41+5:302023-05-19T13:41:28+5:30

चार पैकी एक आरोपी लातूर येथे पोलीस दलात असून अंमलदार पदावर कार्यरत आहे

fraud in police recruitment; Alleged submission of fake certificates of earthquake victims, four booked | पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा

पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा

googlenewsNext

परभणी : पोलिसाची नोकरी मिळविण्यासाठी पोलीस भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या एका उमेदवाराने भूकंपग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी परभणी शहरातील नवा मोंढा ठाण्यात सदर उमेदवारासह अन्य तीन आरोपीविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेची अधिक माहिती अशी, परभणी पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर यांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून उपाधीक्षक राठोड यांनी पोलिस अंमलदार राजकुमार जोशी यांना सदरील आदेश दिले. परभणी पोलीस भरतीत लातूर जिल्ह्यातील शेकापूरवाडी येथील तुकाराम तातेराव फफागिरे याची निवड भूकंपग्रस्त म्हणून झाली होती. भरती दरम्यान तुकाराम फफागिरे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक यांनी लातूर जिल्ह्यातील मुदगड येथील तलाठी यांना पत्र देऊन भूकंपग्रस्त अनुसयाबाई मस्के यांच्याबद्दल माहिती मागविली. यात मुदगडचे तलाठी बालाजी आंबोटे यांनी भूकंप पुनर्वसनमध्ये अनुसयाबाई मस्के यांचे नाव आहे व ते वर्गवारीमध्ये सदर गाव आहे, अशी माहिती दिली. 

याचबरोबर अनुसयाबाई मस्के यांचा तुकाराम फफागिरे हा दत्तक मुलगा हा (मुदगड एकोजी, ता.निलंगा) येथील रहिवासी आहे का ? याबाबत ग्रामसेवकाकडे पत्र देऊन राठोड यांनी माहिती घेतली असता यात तुकाराम फफागिरे यांचे मतदार ओळखपत्र मुदगड येथील नसल्याने त्यांचे स्थानिक मतदार यादीत नाव नाही. तो तेथे राहत नाही, अशी माहिती तहसीलदार निलंगा यांना पत्रक देऊन भूकंपग्रस्त प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या संचिकेच्या छायांकित प्रती तहसीलदारांनी दिल्या. त्यामध्ये सन २०२३ मध्ये धार्मिक विधी करून अनुसयाबाई मस्के हिने तुकाराम तातेराव फफागिरे यास दत्तक घेतल्याचे नमूद आहे. परंतू, चौकशीमध्ये स्थानिक साक्षीदार हे धार्मिक विधी झाला नसल्याचे सांगतात.

ओळखत नसल्याची दिली माहिती
भूकंपग्रस्त प्रमाणपत्र धारक अनुसयाबाई ज्ञानदेव मस्के (रा.मुदगड एकोजी) यांना विचारपूस केली असता त्यांनी मी तुकाराम तातेराव फफागिरे यास दत्तक पत्राद्वारे दत्तक घेतलेले नाही. २० वर्षापूर्वी धार्मिक विधी झालेलाच नव्हता. मी अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन तुकाराम फपागिरे व त्याच्या नातेवाईकांनी खोटे दत्तक पत्र तयार केले व तहसीलदार निलंगा यांच्याकडून भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळविले. मी तुकाराम यास ओळखत नाही, तो माझ्यासोबत राहत नाही, असे महिलेने सांगितले.

खोटा बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक
चौकशी दरम्यान उघडकीस आलेल्या प्रकारातून आरोपी तुकाराम तातेराव फफागिरे, त्याचे वडील तातेराव तुकाराम फफागिरे, त्याची आई भारतबाई तातेराव फफागिरे (सर्व रा.शेकापूरवाडी, ता.उदगीर) व नागू उर्फ नागोराव शिवराम गायकवाड (रा.सावंगी देवेडी, ता. निलंगा या व अन्य अज्ञात इसमांनी शासनाच्या भूकंपग्रस्तांच्या कोट्यातून तुकाराम तातेराव फफागिरे यास शासकीय नोकरी मिळविण्याचा व मिळवून देण्याच्या गैर उद्देशाने शासनाची फसवणूक करण्याचा उद्देशाने दत्तकपत्र वगैरे असा खोटा बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चार आरोपींचा गुन्ह्यात समावेश
यामध्ये तुकाराम तातेराव फफागिरे, तातेराव तुकाराम फफागिरे, नागू उर्फ नागोराव शिवराम गायकवाड, पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चारही जणांना अटक करण्यात आली. यातील आरोपी तुकाराम तातेराव फफागिरे व पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड या दोन आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. इतर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

एक आरोपी लातूरला पोलीस अंमलदार
या घटनेतील आरोपी पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड हा लातूर जिल्ह्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: fraud in police recruitment; Alleged submission of fake certificates of earthquake victims, four booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.