जमीन खरेदी प्रकरणात खासदारांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:53+5:302021-01-18T04:15:53+5:30
परभणी : वारस हक्कसोड प्रमाणपत्र नसताना परस्पर जमीन खरेदी करून खा. बंडू जाधव यांनी आमच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचा आरोप ...
परभणी : वारस हक्कसोड प्रमाणपत्र नसताना परस्पर जमीन खरेदी करून खा. बंडू जाधव यांनी आमच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचा आरोप एरंडेश्वर येथील काळे कुटुंबीयांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील जमीन खरेदीचे प्रकरण दोन दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात रविवारी काळे कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. यावेळी रामप्रसाद काळे यांची पत्नी प्रेमाताई काळे, मुलगी सारिका कदम, शीतल धावेकर, सून वर्षा स्वप्निल काळे, सुहास देशमुख पेडगावकर, आदींची उपस्थिती होती. कुटुंबीयांनी सांगितले की, एरंडेश्वर शिवारातील ३ एकर ३५ गुंठे जमीन खा. बंडू जाधव यांनी वडील रामप्रसाद काळे यांच्याकडून बळजबरीने खरेदी केली. या जमिनीच्या अद्याप वाटण्या झाल्या नाहीत. तसेच खरेदी व्यवहार करताना कुठेही जाहीर प्रगटन दिले नाही किंवा हक्कसोड प्रमाणपत्र देखील जोडलेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांची संमती नसताना केलेला हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बळजबरीने व्यवहार झाल्याने वडील रामप्रसाद काळे हे मानसिक तणावाखाली आहेत. विशेष म्हणजे, एरंडेश्वर येथील या जमिनीत विहीर, सागवानाची ११० झाडे, दोन बोअर आहेत. मात्र, जमीन खरेदी करताना ती कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे विहीर आणि बोअर असताना ही जमीन कोरडवाहू कशी दाखविली, असा सवाल यावेळी करण्यात आला. कुटुंबीयांची संमती न घेताच परस्पर आणि वडिलांवर दबाव टाकून हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणी न्यायासाठी मुंबई येथे शिवसेना भवनासमोर उपोषण करणार असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. एरंडेश्वर परिसरातील जमिनीचे बाजारमूल्य साधारणत: १० कोटी रुपयांचे आहे. ती केवळ ४४ लाखांना आम्ही का विक्री करावी, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.