जमीन खरेदी प्रकरणात खासदारांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:55+5:302021-01-18T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : वारस हक्कसोड प्रमाणपत्र नसताना परस्पर जमीन खरेदी करून खासदार बंडू जाधव यांनी आमच्या कुटुंबाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वारस हक्कसोड प्रमाणपत्र नसताना परस्पर जमीन खरेदी करून खासदार बंडू जाधव यांनी आमच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप एरंडेश्वर येथील काळे कुटुंबियांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील जमीन खरेदीचे प्रकरण दोन दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात रविवारी काळे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. यावेळी रामप्रसाद काळे यांची पत्नी प्रेमाताई काळे, मुलगी सारिका कदम, शीतल धावेकर, सून वर्षा स्वप्नील काळे, सुहास देशमुख-पेडगावकर आदी उपस्थित होते. काळे कुटुंबियांनी सांगितले की, एरंडेश्वर शिवारातील ३ एकर ३५ गुंठे जमीन खासदार बंडू जाधव यांनी वडील रामप्रसाद काळे यांच्याकडून बळजबरीने खरेदी केली. या जमिनीच्या अद्याप वाटण्या झालेल्या नाहीत. तसेच खरेदी व्यवहार करताना कुठेही जाहीर प्रकटन दिले नाही किंवा हक्कसोड प्रमाणपत्रही जोडलेले नाही. त्यामुळे कुटुंबियांची संमत्ती नसताना केलेला हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच बळजबरीने व्यवहार झाल्याने वडील रामप्रसाद काळे हे मानसिक तणावाखाली आहेत. विशेष म्हणजे, एरंडेश्वर येथील या जमिनीत विहीर, सागवानाची ११० झाडे, दोन बोअर आहेत. मात्र, जमीन खरेदी करताना ती कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे विहीर आणि बोअर असताना ही जमीन कोरडवाहू कशी दाखवली, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. काळे कुटुंबियांची संमत्ती न घेताच परस्पर आणि वडिलांवर दबाव टाकून हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. आता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. याप्रकरणी न्यायासाठी मुंबई येथे शिवसेना भवनसमोर उपोषण करणार असल्याचेही काळे कुटुंबियांनी सांगितले. एरंडेश्वर परिसरातील जमिनीचे बाजारमूल्य साधारणत: १० कोटी रुपये आहे. त्यामुळे ही जमीन केवळ ४४ लाख रुपयांना आम्ही का विकावी, असा प्रश्नही यावेळी काळे कुटुंबियांकडून उपस्थित करण्यात आला.
व्यवहार नियमानुसार : खासदार जाधव
या जमीन व्यवहारासंदर्भात खासदार बंडू जाधव यांनी १४ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन एरंडेश्वर येथील शेतजमीन खरेदीचा व्यवहार पूर्णपणे नियमानुसार केल्याचे म्हटले होते. तसेच विरोधकांकडून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोपही खासदार जाधव यांनी केला होता. काळे कुटुंबियांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद होता.