माल वाहतुकीनेही एसटीला दिला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:13+5:302021-04-26T04:15:13+5:30
परभणी : जिल्ह्यात संचारबंदीमुळे प्रवासी वाहतूक बंद असून, या प्रवासी वाहतुकीसाठी पर्याय म्हणून समोर आलेल्या माल वाहतुकीलाही यंदा फारसा ...
परभणी : जिल्ह्यात संचारबंदीमुळे प्रवासी वाहतूक बंद असून, या प्रवासी वाहतुकीसाठी पर्याय म्हणून समोर आलेल्या माल वाहतुकीलाही यंदा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मागच्या २१ दिवसांमध्ये एसटी महामंडळाने माल वाहतुकीतून अवघे १४ लाखांचे उत्पन्न कमावले आहे. त्यामुळे महामंडळासमोर आर्थिक संकटे उभी होत आहेत.
जिल्ह्यात बससेवेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. सरासरी १७ लाख रुपये दररोज उत्पन्न मिळविणारी ही निमसरकारी यंत्रणा असून, प्राप्त झालेल्या उत्पन्नावरच महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च भागविला जातो. मात्र मागील वर्षीपासून या यंत्रणेला कोरोनाच्या संकटाचे ग्रहण लागले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाने माल वाहतुकीचा पर्याय निवडला. त्यास चांगला प्रतिसादही मिळाला होता. यावर्षी देखील कोरोनाचे संकट कायम असून, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने माल वाहतुकीवर भर दिला. मात्र कोरोना संकटामुळे राज्यातील उलाढाल ठप्प पडली आहे. बाजारपेठा बंद असून, जिल्ह्यात कृषी माल वगळता इतर मालाची वाहतूक होत नसल्याने यावर्षी माल वाहतुकीलाही प्रतिसाद मिळाला नाही. १ ते २१ एप्रिल या काळात महामंडळाच्या परभणी विभागाला केवळ १४ लाख ३४ हजार रुपयांचे उत्पन्न हाती लागले आहे. दररोज १७ ते १८ लाख रुपये कमावणाऱ्या परभणी विभागाला २१ दिवसांमध्ये १४ लाख रुपये कमविता आले. त्यामुळे परभणी विभागासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
२९ हजार किमीचा प्रवास
माल वाहतूक करण्यासाठी महामंडळाच्या बसेसने २१ दिवसात केवळ २९ हजार किमीचा प्रवास केला. २३१ फेऱ्यांमधून मालाची वाहतूक करण्यात आली. परभणी जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असते तर महामंडळाला माल वाहतुकीचा निश्चितच फायदा झाला असता मात्र औद्योगिक क्षेत्र नसल्याने फटका सहन करावा लागत आहे.